तान्हुल्याला पतीच्या कुशीत सोडून ‘ती’ला पोलिस व्हायचेय; ६ लाख उमेदवार मुंबईत, महिला-पुरुषांचा फलाटावरच मुक्काम
By मनीषा म्हात्रे | Published: August 9, 2024 09:28 AM2024-08-09T09:28:09+5:302024-08-09T09:29:47+5:30
एका बाजूला महिला तान्हुल्या बाळांना पतीच्या कुशीत सोडून स्वप्नांच्या दिशेने धावताना दिसल्या, तर त्यांचे पती मैदानासह फुटपाथवर बाळाला शांत करतानाचे चित्र पाहावयास मिळत होते...
मुंबई : पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून राज्यभरातील तरुण, तरुणींनी मैदानी चाचणीसाठी मुंबई गाठली आहे. पोलिस दलातील ४,२३० पदांसाठी तब्बल ५ लाख ८० हजार उमेदवार रिंगणात आहेत. त्यात सव्वालाख महिला आहेत. मुंबईत राहण्याचा खर्च परवडणारा नसल्याने अनेकांनी कुटुंबीयांसह फुटपाथ, रेल्वे फलाट, पुलांचा आधार घेतला आहे. एका बाजूला महिला तान्हुल्या बाळांना पतीच्या कुशीत सोडून स्वप्नांच्या दिशेने धावताना दिसल्या, तर त्यांचे पती मैदानासह फुटपाथवर बाळाला शांत करतानाचे चित्र पाहावयास मिळत होते.
भरतीसाठी मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुलात महिलांची, तर घाटकोपर पोलिस मैदानात पुरुषांची चाचणी सुरू आहे. उमेदवारांमध्ये मुंबईसह बीड, चंद्रपूर, अमरावती, पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, मुळशी, चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणच्या उमेदवारांचा समावेश आहे. एका दिवशी दहा हजार जणांची चाचणी होत आहे. काहींनी घाटकोपरमध्ये फलाटासह ब्रिजचा आडोसा घेतला आहे. पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना राहण्यासाठी व्यवस्था नाही, त्यातच स्थानकातील शौचालयही रात्रीचे बंद होत असल्याने नैसर्गिक विधीसाठी रस्त्यावर जायचे का, असा सवालही काही महिला उमेदवारांनी केला. ठरलेल्या वेळेप्रमाणे मैदानात घेत नसल्यानेही अख्खा दिवस मैदानी चाचणीत जातो. या उमेदवारांनी पोटाला चिमटा घेऊन मुंबई गाठलेली असते. त्यात दिवस चाचणीच्या प्रतीक्षेत जात असल्याने पोटात काही नसते. त्याचा फटकाही मैदानी चाचणीदरम्यान बसत असल्याची खंत बीडवरून आलेल्या एका उमेदवाराने व्यक्त केली.
बाबा, आई पोलिस होणार...
नगरच्या श्रीरामपूर येथून आलेले तानाजी खोत कुटुंबीय. तानाजी हे स्वत: २०१७ पासून पोलिस भरतीसाठी प्रयत्न करत आहेत. लग्नानंतर पत्नीनेही पोलिस होण्याचे ठरवले. दोघांनी मिळून पोलिस भरतीची तयारी केली. तानाजी सांगतात, यावेळी त्यांची पत्नी चौथ्यांदा पोलिस भरतीत उतरली आहे. त्यांचा चार वर्षांचा चिमुकलादेखील ‘बाबा, आई पोलिस होणार’ म्हणून आनंदात फलाटावर रमताना दिसला.
फलाटच बनले घर
अमरावतीची आरती अशोक सुसतकर सांगते, शुक्रवारी मैदानी चाचणी आहे. त्यामुळे दुपारीच येथे आली. राहण्याची व्यवस्था नसल्याने सध्या आजची रात्र फलाटावरच काढणार आहे. त्यानंतर दोन दिवसांत कारागृह पोलिससाठीची चाचणी आहे. त्यासाठीही येथेच थांबणार आहे.