मुंबई : मरिन ड्राइव्हवर पिवळ्या एलईडीऐवजी पांढरे एलईडी बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र त्यांची देखभाल कोण करणार, या प्रश्नावरून सध्या टोलवाटोलवी सुरू आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबत बेस्ट प्रशासनाकडे माहिती अधिकारांतर्गत विचारणा केली होती. बेस्टच्या विभागीय अभियंत्यांनी माहिती अधिकाऱ्याला दिलेल्या माहितीनुसार, ६४४ दिवे काढण्यात आले आहेत. नवे दिवे कोणत्या कंपनीचे आहेत, याबाबत बेस्टला माहिती नाही. महत्त्वाचे म्हणजे बेस्ट आणि पालिका प्रशासनात झालेल्या तसेच जी कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत, त्यात बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. मेसर्स ईईएसएलने ७ वर्षे वीज बचत करण्याच्या कामगिरीकरिता सातत्य ठेवण्याचे प्रस्तावित केले आहे. तरी केबल, पोल्स, ब्रॅकेट्स आदीचे परिरक्षण अद्यापही बेस्टकडे आहे. भविष्यातील अडचणी सोडविण्यासह गोंधळ टाळण्यासाठी स्ट्रीट लाइट सिस्टीमसाठी एकानेच तक्रारी स्वीकारणे योग्य ठरेल. त्यासाठी मेंटेनन्स प्रक्रिया स्पष्टपणे परिभाषित करणे आवश्यक आहे, असे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे. मात्र अद्याप या पत्राला काहीच उत्तर मिळाले नसल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)
एलईडी दिव्यांवरून पुन्हा टोलवाटोलवी
By admin | Published: November 09, 2015 3:11 AM