Join us

मुंबई विमानतळाच्या संरक्षक भिंतीवर एलईडी दिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 4:06 AM

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (मुंबई) संरक्षक भिंतीवर एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी होणारे घुसखोरीचे ...

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (मुंबई) संरक्षक भिंतीवर एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी होणारे घुसखोरीचे प्रकार तात्काळ निदर्शनास येण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.

विमानतळालगत असलेल्या झोपडपट्ट्यांच्या बाजूने विमानतळाच्या संरक्षक भिंतीवरून उड्या मारून आत घुसण्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. २०१९मध्ये एका मनोविकृताने अशाचप्रकारे विमानतळाची भिंत ओलांडून घुसखोरीचा प्रयत्न केला. रात्रीच्या अंधारात तो भिंत चढताना सुरक्षा रक्षकांच्या नजरेत आला नाही. त्यामुळे त्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. त्यानंतर त्याने एका विमानाच्या दिशेने आगेकूच करताच तो सुरक्षा रक्षकाच्या दृष्टीस पडल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी संरक्षक भिंतींच्या बाह्य बाजूने उजेड होईल, अशा प्रकारे एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विमानतळालगत ड्रोन उडवण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) मनाई केली आहे. विमानांचे उड्डाण होताना किंवा विमान खाली उतरताना ड्रोनचा अडथळा निर्माण झाल्यास मोठ्या अपघाताची शक्यता लक्षात घेऊन डीजीसीएने हे निर्देश जारी केले आहेत. मात्र, तरीही काही हौशी तरुण अंधाराचा फायदा घेऊन विमानांचे टेक ऑफ आणि लॅण्डिंग आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी ड्रोनचा वापर करतात. आता एलईडी दिवे बसविल्याने असे प्रकारही सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास येतील, असेही सांगण्यात आले.

........................

फायदा काय?

- अंधाराचा फायदा घेऊन होणारे घुसखोरीचे प्रकार रोखता येतील.

- सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून ड्रोन उडवणाऱ्यांवर वॉच ठेवणे शक्य होईल.

- झोपडपट्ट्यांच्या छतावर चढून विमानांचे टेक ऑफ आणि लॅण्डिंग पाहणाऱ्यांवरही नजर ठेवता येणार.