डावखरेंची जुनी खाती सेनेकडून बंद!
By admin | Published: May 2, 2016 01:16 AM2016-05-02T01:16:55+5:302016-05-02T01:16:55+5:30
विधान परिषदेचे उपसभापतीपद भूषविलेले आणि १९९२ पासून चार वेळा निवडून गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांना या वेळी पाठींबा न देता शिवसेनेने त्यांच्याविरोधात
ठाणे : विधान परिषदेचे उपसभापतीपद भूषविलेले आणि १९९२ पासून चार वेळा निवडून गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांना या वेळी पाठींबा न देता शिवसेनेने त्यांच्याविरोधात सक्षम उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ‘पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जुनी खाती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे स्पष्ट संकेत शिवसेनेच्या नेत्यांनी देण्यास सुरूवात केल्याने दीर्घकाळानंतर ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत रंगत येण्याची चिन्हे आहेत.
पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गेल्याच आठवड्यात शिवसेनेच्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आणि शिवसेनेसोबत गेल्या २५ वर्षांच्या मैत्रीचे दाखले देणाऱ्या वसंत डावखरे यांना यंदा ‘डाव’ खरे होणार नाहीत, असे जाहीरपणे सांगितल्याने तेव्हाच शिवसेनेची भूमिका स्पष्ट झाली होती. ‘वरून’ सांगितल्याशिवाय कदम जाहीररित्या असे वक्तव्य करणार नाहीत, हेही शिवसैनिकांनी ओळखले होते. मात्र त्या आधीच्या आठवड्यात बदलापूरच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर बसून डावखरे यांनी आपल्या उमेदवारीला पाठींबा देण्याबाबत कानगोष्टी केल्या होत्या आणि विजय निश्चित असल्यानेच मी या निवडणुकीत उतरलो आहे, असे सांगत शिवसेना-भाजपाच्या नगरसेवकांना चुचकारण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या ‘वसंतपर्व’ पुस्तिकेचे वाटप करत त्यांनी शिवसेना, भाजप, काँगेस, राष्ट्रवादी, मनसे, बहुजन विकास आघाडी अशा वेगवेगळ््या पक्षांतील संबंधांचा आढावा घेत मलाच पाठींबा देणे योग्य असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्नही केला होता.
या निवडणुकीसाठी शिवसेनेत ठाणे शहरातून अनंत तरे, रवींद्र फाटक, एच. एस. पाटील यांच्यात तीव्र चुरस आहे. त्यातील प्रत्येकाला पक्षाने यापूर्वी संधी दिली आहे. आता त्यातील कोणालाही पुढे केल्यास अन्य उमेदवार नाराज होणार आणि त्या असंतुष्टांचा फटका पुढील वर्षी होणाऱ्या ठाणे महापालिका निवडणुकीत पक्षाला बसणार हे लक्षात आल्याने अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचे नाव पक्षातर्फे निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. त्यातून उमेदवारी आपोआपच ठाणे शहराबाहेर जाईल, हाही हेतू आहे. उमेदवारी निश्चित झाली नसती तर चौधरी यांनी ‘पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे सांगतील, ती भूमिका घेऊ,’ असे सांगत आपली सुटका करून घेतली असती; मात्र ते थेट ‘मी पक्षाकडे विधान परिषद लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे,’ असे सांगत आहेत. यातूनच त्यांचे नाव ‘मातोश्री’वरून अंतिम होण्याची शक्यता आहे.
चौधरींच्या
नावातून चाचपणी
शिवसेनेने थेट मुंबईतून सुनील चौधरी यांचे नाव मीडियाच्या चर्चेत आणले आणि चाचपणी केली. त्यावर पक्षात काय प्रतिक्रिया उमटतात, ते जाणून घेतले. अगदीच तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असत्या तर त्याबाबत पक्षाने लगेच खुलासा केला असता, पण तसे काहीही झाले नाही. त्यामुळे ठाण्यात योग्य संदेश पोचला आणि पक्षाची चाचपणीही पूर्ण झाली.
शिंदेंनी केली खलबते?
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनील चौधरी यांच्याशी या निवडणुकीबाबत दीर्घकाळ खलबते केल्याचे सांगितले जाते.
चौधरी यांचा उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरच्या नगरसेवकांशी चांगला संपर्क आहे. ठाणे-कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत खुद्द शिंदे यांनीच शब्द टाकला की काम फत्ते होईल, अशी स्थिती आहे.
शिवाय गेल्या काही काळात चौधरी पक्षाच्या कार्यक्रमांना नियमित हजेरी लावून आपली ओळख निर्माण करीत होते. पालघरची जबाबदारी खुद्द शिंदे यांनीच खांद्यावर घेतल्याने पक्षाची आखणी जवळपास पूर्ण झाल्याचे मानले जाते.
तरेंना कार्ला प्रकरण भोवले
कार्ल येथील एकविरा देवीच्या यात्रेतील मानापमानाचा वाद अध्यक्ष या नात्याने अनंत तरे यांनी थोडा सामोपचाराने, प्रसंगी समजूत काढून सोडवायला हवा होता. मात्र त्यावरून मारामारी झाल्याने आणि पेणच्या भक्तांनी ठाण्यातील शिवसैनिकांना फटकावल्याने त्याची प्रतिक्रिया ठाण्यात उमटली. निदर्शने झाली. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याविरूद्ध निदर्शने होऊनही एकाही नेत्याने निदर्शकांना न रोखल्याने तरे यांना हे प्रकरण भोवल्याचे मानले जाते.
पंत आणि युतीतील सामंजस्य
तीन दिवसांपूर्वी बदलापूरच्या कार्यक्रमात लोकसभेचे माजी सभापती असलेल्या मनोहर जोशींनी युतीतील सामंजस्यावरून आपल्या पक्षातील आणि भाजपातील नेत्यांचे कान टोचले होते. पण त्यांची ती टीका कोणीही गंभीरपणे घेतली नाही. मनोहर जोशींसारख्या पक्षातील ज्येष्ठांची किंवा वारंवार संधी दिलेल्या व्यक्तींची खाती बंद झाल्याचे ते द्योतक आहे, हे शिवसेनेतील काही नेत्यांनीच लक्षात आणून दिल्याने आता बाहेरील खातीही बंद केली जाण्याची प्रक्रिया पक्षात सुरू असल्याचे सांगितले जाते.