Join us  

प्रस्थापितांविरोधात डाव्यांची ‘मोट’

By admin | Published: October 18, 2015 1:50 AM

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या प्रस्थापित पक्षांविरोधात डाव्या विचारसरणीचे सर्व पक्ष एकत्रित आले आहेत.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या प्रस्थापित पक्षांविरोधात डाव्या विचारसरणीचे सर्व पक्ष एकत्रित आले आहेत. आॅल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकच्या नेतृत्त्वाखाली त्यांनी कल्याण-डोंबिवली लोकशाही आघाडी स्थापन केली असून, आघाडीच्या वतीने ४२ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.यात फॉरवर्ड ब्लॉक पक्ष १६ जागा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्स्कवादी कम्युनिस्ट पक्ष (प्रत्येकी ४) समाजवादी २ अशा २४ जागा लढविल्या जाणार आहेत. या आघाडीला शिवराज्य पक्ष, धर्मराज्य पक्ष, आम विकास पक्ष आणि युनायटेड मायनोरीटी फ्रंट यांच्यासह १८ जागा लढविणारी बहुजन विकास आघाडी यांचा पाठिंबा असल्याचा दावा फॉरवर्ड ब्लॉकचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतीशराजे शिर्के यांनी कल्याणमधील आयोजित पत्रकार परिषदेत केला. एकत्रित लढणारे आघाडीचे काही उमेदवार फॉरवर्ड ब्लॉकच्या चिन्हावर लढत देणार आहेत, तर काही उमेदवार पुरस्कृत म्हणून लढतील, असे त्यांनी सांगितले. प्रस्थापित पक्षांनी कल्याण-डोंबिवलीच्या जनतेची घोर निराशा केली असून, जी परिस्थिती १९९५ मध्ये होती, ती आजतागायत कायम आहे.चालायला रस्ते नाहीत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कचऱ्याची समस्या याकडे पुरते दुर्लक्ष केले आहे. यंदाही निवडणुकीत उमेदवार देताना केवळ घराणेशाहीला महत्त्व दिले गेले असून, पाचही पक्षांना पर्याय म्हणून मतदारांसाठी लोकशाही आघाडी स्थापन केल्याचे ते म्हणाले.ताळमेळाचा अभाव-निवडणुकीत २४ जागांवर लढणाऱ्या लोकशाही आघाडीच्या उमेदवारांची यादी पत्रकार परिषदेत दिली. कांचनगाव-खंबाळपाडा प्रभागात भाजपचा उमदेवार बिनविरोध निवडून आला असतानाही, जाहीर केलेल्या यादीत आघाडीच्या उमेदवाराचे नाव जैसे थे च ठेवले आहे. -प्रभाग क्रमांक १०१ हनुमाननगरच्या उमेदवाराचे नाव यादीत दिलेले नाही. या संदर्भात त्यांच्याकडे विचारणा केली असता, संबंधित यादी दोन दिवसांपूर्वीची असून, वेळ अपुरा असल्याने अद्ययावत यादी देता आली नाही, तसेच कम्युनिस्ट पक्षाकडून नाव दिलेले नाही, अशी सारवासारव त्यांनी केली. यावरून आघाडीत ताळमेळ नसल्याचे दिसून आले.