डावी, उजवी विचारसरणी यापुढे राहणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 06:05 AM2019-07-12T06:05:43+5:302019-07-12T06:06:53+5:30
आदित्य ठाकरे : मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राचा प्रारंभ
कल्याण : जागतिक पातळीवर राजकीय पक्षांना कोणत्याही प्रकारची वैचारिक भूमिका राहिलेली नाही. ‘डावी’ आणि ‘उजवी’ अशी विचारसरणी येत्या काळात अस्तित्वात राहणार नाही. लोकांच्या समस्यांवर तत्काळ उत्तर शोधून देणे, याच विचारसरणीचा राजकीय पक्षांना अवलंब करावा लागेल, असे मत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी व्यक्त केले.
मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राच्या शैक्षणिक कामाचा शुभारंभ ठाकरे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा.डॉ. श्रीकांत शिंदे, आ. सुभाष भोईर, कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, महापौर विनीता राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले की, राजकीय पक्षाची भूमिका ही लोकाभिमुख व शहरांतील जीवनमान सुधारण्यासाठी हवी. विद्यापीठाने ओशनॉलॉजी आणि अॅप्लाइड सायन्सेसचे शिक्षण सुरू केले, ही चांगली बाब असली तरी शहरीकरणाचाही एखादा अभ्यासक्रम सुरू करावा.
अनेक विद्यार्थ्यांना शहरासाठी काही उपक्रम राबवण्याची इच्छा असते. त्यांच्याकडे नवनव्या संकल्पना असतात. पण त्यांना पाठबळ मिळत नाही. त्यांच्यासाठी इनोव्हेटिव्ह लॅब सुरू करता आली, तर त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे.
माहिती सगळ्यांकडेच असते. मात्र तिचे ज्ञानात रूपांतर करणे महत्त्वाचे आहे. नागरिकांचा सिव्हीक सेन्स अधिक सुधारावा. शहरातील वाहतूककोंडीत मोटार कशी चालवावी, यासारख्या गोष्टींमध्ये सुधारणा केवळ शिक्षणामुळे शक्य आहे. त्यामुळे शिक्षण महत्त्वाचे आहे. या उपकेंद्रासाठी महापालिकेने सर्वतोपरी मदत करावी. त्यांच्या पाठीशी उभे राहावे. मी स्वत: उपकेंद्राच्या पाठीशी उभा आहे, अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.
मान्यवरांचे स्वागत पुस्तक भेटीने
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाचे कुलसचिव अजय देशमुख यांनी केले व उपकेंद्राच्या स्थापनेमागील विद्यापीठाची भूमिका विशद केली. मान्यवरांचे स्वागत पुस्तके भेट देऊन करण्यात आले. विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी जागा देणाऱ्या वायले व सुतार कुटुंबीयांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन आरेकर यांनी केले.m
‘उपकेंद्रामुळे विद्यापीठाचे विभाजन टळले’
उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री वायकर म्हणाले की, मुंबई विद्यापीठाशी ७२५ पेक्षा जास्त महाविद्यालये संलग्न आहेत. विद्यापीठाचा पसारा मोठा आहे. मध्यंतरी विद्यापीठाच्या विभाजनाचा मुद्दा आला होता. मात्र उपकेंद्रामुळे विभाजन टळले आहे. ओशनॉलॉजी अर्थात समुद्रविषयक अभ्यासक्रमाची सुरुवात कल्याण उपकेंद्रातून होत असली, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप गावी समुद्रविषयक अभ्यासाठी वाहिलेले दुसरे विद्यापीठ सुरू करण्याचा मानस आहे, याकडे वायकर यांनी लक्ष वेधले.
शिक्षण गुणात्मकदृष्ट्या दर्जेदार हवे - कुलगुरू
कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर म्हणाले की, विद्यापीठे आणि महाविद्यालयांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत शिक्षणाच्या गुणात्मक दर्जात वाढ झाली पाहिजे. विद्यापीठ हे केवळ परीक्षा घेणारे केंद्र न बनता रोजगाराभिमुख शिक्षण देणारे ज्ञानाचे केंद्र झाले पाहिजे.विद्यापीठातून ज्ञानाची निर्मिती झाली पाहिजे. हे ज्ञान समाजाभिमुख असले पाहिजे. तरच त्या ज्ञानाचा उपयोग आहे. केवळ अॅकॅडमिक शिक्षणाला काही महत्व नाही. आपल्याकडे अॅकॅडमिक शिक्षणाचा हेतू डोळ्यांसमोर ठेवून शिक्षण घेतले जाते. मुंबई विद्यापीठाचा विस्तार पाहता या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राला ७२५ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असल्याने समुद्रसंपत्तीचा अभ्यास करणारा अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याची सुरुवात कल्याणमधून झाली आहे.