मुंबई पाहण्यासाठी पश्चिम बंगाल सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 05:47 AM2019-04-10T05:47:02+5:302019-04-10T05:47:13+5:30
दोन अल्पवयीन मुले : खांदा वसाहत परिसरातून घेतले ताब्यात
नवी मुंबई : मुंबईच्या आकर्षणापोटी पश्चिम बंगालमधून पळून आलेल्या दोघा अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखा पोलिसांनी खांदा वसाहत परिसरातून ताब्यात घेतले. ही मुले खांदा वसाहत परिसरात राहत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. चौकशीत मुंबईचे आकर्षण असल्याने मुंबई पाहण्यासाठी घर सोडून आल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक कारणांनी मुंबई ही देशासह जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेकांमध्ये मुंबईविषयी उत्सुकता व आकर्षण दिसून येते. त्याच आकर्षणातून प्रत्यक्षात मुंबई पाहण्यासाठी पश्चिम बंगालच्या दोन अल्पवयीन मुलांनी घर सोडले होते. मात्र, त्यांनी घरातून निघताना कुटुंबातील कोणालाही कल्पना न दिल्याने स्थानिक पोलीस ठाण्यात त्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दिनजापूर येथील एका सामाजिक संस्थेने या मुलांचा शोध घेण्यासाठी नवी मुंबई पोलिसांना देखील त्यांची छायाचित्रे पाठवली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने तपास सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक आनंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुनीता भोर, हवालदार हनुमंत शितोळे, पोलीस नाईक विकास जाधव आदींचे पथक तयार करण्यात आले. त्यांनी मुलांकडील मोबाइलच्या सीडीआर तपसला. त्यानुसार ती खांदा वसाहत परिसरात असावीत, असा अंदाज आला.
तपासाअंती गुन्हे शाखेच्या पथकाने खांदा वसाहत सेक्टर ५ येथील पत्र्याच्या शेडमधून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, मुंबई पाहण्यासाठी कोणालाही न सांगता घर सोडून आल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांना कुटुंबाच्या ताब्यात देण्यासाठी कर्जत बालसुधारगृहात ठेवले आहे.