Join us

पायाला जखम? साचलेल्या पाण्यातून चालू नका; ‘लेप्टोस्पायरोसीस’ आजार होण्याची शक्यता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 10:28 AM

शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.

मुंबई : शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. अशा स्थितीत पायावर जखम असलेली व्यक्ती साचलेल्या पावसाच्या पाण्यातून चालत गेल्यास जखमेचा पाण्याशी संपर्क येऊन `लेप्टोस्पायरोसीस` आजार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. शक्यतो पाण्यातून चालणे टाळावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

काय आहे ‘लेप्टोस्पायरोसीस’?

हा एक गंभीर आजार आहे. वेळीच औषधोपचार न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे याबाबत वेळीच प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात कोणताही ताप हा डेंग्यू, मलेरिया अथवा ‘लेप्टोस्पायरोसीस’ असू शकतो. त्यामुळे कोणत्याही तापाकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लेप्टो’ टाळण्यासाठी काय कराल?

पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे.गमबुटाचा वापर करावा.

साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुऊन कोरडे करा.अशा व्यक्तींनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत.

अतिवृष्टीदरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते. याच पाण्यात ‘लेप्टोस्पायरोसिस’ या रोगाचे ‘लेप्टोस्पायरा’ (स्पायराकिट्स) हे सूक्ष्म जंतू असू शकतात.  अशा पाण्याशी माणसाचा संपर्क आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते. व्यक्तीच्या पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जखम असेल, अथवा साधे खरचटलेले जरी असेल तरी अशा छोट्याशा जखमेतूनही लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत.- डॉ. दक्षा शहा, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका