अग्निरोधक यंत्रणा उभारा, पालिकेची ताकीद; अन्यथा कायदेशीर कारवाई, आयुक्तांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 10:00 AM2024-06-03T10:00:16+5:302024-06-03T10:01:38+5:30
अग्नी सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या चार वर्षांत उंच इमारती, झोपडपट्टी, कार्यालये, हॉटेल, दुकाने आदी ठिकाणी आगी लागण्याच्या जवळपास १७ हजार ९२४ घटना घडल्या आहेत.
मुंबई : शहरात आगीच्या घटना वाढत असून, त्या रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आगीच्या घटनांना जबाबदार असलेल्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. त्याच धर्तीवर वारंवार पाहणी किंवा नोटीस देऊनही अग्निरोधक प्रणाली न लावणारे किंवा ती अद्ययावत न ठेवणारे मालमत्ताधारक आणि इमारतींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी सूचना महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी संबंधितांना केली आहे.
अग्नी सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या चार वर्षांत उंच इमारती, झोपडपट्टी, कार्यालये, हॉटेल, दुकाने आदी ठिकाणी आगी लागण्याच्या जवळपास १७ हजार ९२४ घटना घडल्या आहेत. तर, गेल्यावर्षी चार हजारांहून अधिक आगीच्या घटना घडल्या असून, त्यांचे प्रमाण २०२२ च्या तुलनेत सात टक्क्यांनी अधिक होते. मुंबईत ८० टक्के आगीच्या घटना शॉर्टसर्किटमुळे घडल्या आहेत. भविष्यात आगीच्या घटना टाळण्यासाठी फायर ऑडिट करावे, तसेच अग्निशमन यंत्रणा सक्षम आहे का, याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.
उंच इमारतींमध्ये आगीच्या घटना रोखण्यासाठी इव्हॅक्युएशन लिफ्टसाठी मार्गदर्शक तत्त्वे आवश्यक आहेत; मात्र त्यांचे पालन या उंच इमारतीतील रहिवासी आणि सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या समितीकडून होत नाही. त्यामुळे आग लागल्यास बचाव कार्य करतानाही अग्निशमन दलाला अडचणींचा सामना करावा लागतो, याकडेही पालिकेने लक्ष वेधले आहे.
सोसायट्यांना ‘हे’ बंधनकारक-
१) सर्व इमारतींमधील विशेषतः उत्तुंग इमारतींमधील अग्निशमन यंत्रणा आणि उपकरणे, तसेच आगीची धोक्याची सूचना देणारी उपकरणे योग्यरीत्या सुरू असल्याची खातरजमा सोसायट्यांनी करणे आवश्यक आहे.
२) त्याचप्रमाणे महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियमांमधील तरतुदींचे पालन करणे हे संबंधित मालक, भोगवटादार यांच्यासाठी बंधनकारक आहे.
काय आहेत नियम?
१) महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ च्या कलम ३(१)नुसार, इमारतीमधील आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक योजनेमधील अग्निशमन यंत्रणा उत्तम व कार्यक्षम स्थितीत असल्याबाबत परवानाप्राप्त असणे आवश्यक आहे. तसेच कलम ३(३) नियम ४(२) नुसार, ‘नमुना ब’ सहामाही प्रमाणपत्र वर्षातून दोनदा म्हणजे, जानेवारी व जुलै महिन्यांत प्राप्त करून घेणे बंधनकारक आहे.
२) इमारतींमध्ये अंतर्गत सजावटीसाठी ज्वलनशील पदार्थांचा वापर, मूळ अंतर्गत संरचना, अग्निसुरक्षा यंत्रणेत व विद्युत संरचनेतही फेरफार केले जात. त्यामुळे असे प्रकार टाळावेत, असे आवाहन पालिकेने केले आहे.