मुंबई : शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तका खान यांचे रविवारी दुपारी मुंबईत त्यांच्या राहत्या घरी निधन झाले, ते 89 वर्षांचे होते. स्नूषा नम्रता गुप्ता-खान यांनी उस्ताद गुलाम मुस्तका खान यांच्या निधनाची बातमी दिली.
नम्रता गुप्ता-खान यांनी पीटीआयशी दिलेल्या माहितीनुसार, उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी रविवारी दुपारी 12.37 वाजता अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळापासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते.
सकाळी त्यांची प्रकृती ठीक होती, मात्र दुपारी अचानक त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकृती ठीक असताना अचानक मृत्यूची बातमी ऐकून त्यांच्या कुटुंबीयांनाही धक्का बसल्याचे नम्रता गुप्ता-खान यांनी सांगितले.
उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना 1991 मध्ये पद्मश्री, 2006 मध्ये पद्मभूषण आणि 2018 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारही देण्यात आला आहे.
उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्यासोबत काम केलेल्या भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका लता मंगेशकर आणि संगितकार ए. आर. रहमान यांनी त्यांच्या निधनाबद्धल शोक व्यक्त केला असून सोशल मीडियावरुन श्रद्धांजली वाहिली आहे.
उस्ताद गुलाम मुस्तफा खान हे रामपूर-सहसवान घराण्यातील असून 1931 साली बदायूमध्ये त्यांचा जन्म झाला होता. आपल्या प्रतिभेने, कलेने त्यांनी देश-विदेशात उत्तर प्रदेशचे नाव पोहोचवले. गुलाम मुस्तफा खान यांनी अगदी लहान वयातच गायला सुरुवात केली होती.