Join us

पार्श्वगायक भूपिंदर सिंह यांचे निधन; मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 5:34 AM

रात्री उशिरा ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : पार्श्वगायनासह गझल गायन आणि गिटारवादनासाठी ओळखले जाणारे भूपिंदर सिंह (८२) यांचे सोमवारी येथे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आरोग्यविषयक विविध तक्रारींनी ग्रासलेल्या भूपिंदर यांच्यावर अंधेरीतील क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरू होते. अशातच त्यांना कोविडची लागण झाली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी मिताली सिंह आणि मुलगा असा परिवार आहे. रात्री उशिरा ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अमृतसरमध्ये जन्मलेल्या भूपिंदर यांनी ‘मौसम’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘दूरियां’, ‘हकीकत’ अशा बऱ्याच चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. दिवंगत संगीतकार आर. डी. बर्मन यांच्याशी त्यांचे ऋणानुबंध जुळले आणि या जोडीने ‘दम मारो दम...’, ‘वादियां मेरा दामन...’, ‘चुरा लिया है...’, ‘चिंगारी कोई भडके...’, ‘तुम जो मिल गए हो...’ अशी सरस गाणी दिली.

मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

आपल्या भावस्पर्शी आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कलावंत हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूपिंदर यांना श्रद्धांजली वाहिली. 

टॅग्स :बॉलिवूड