मुंबई: कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढताना पाहायला मिळत आहे. याशिवाय ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांमध्येही वाढ होताना दिसत आहे. अनेक नेतेमंडळी, बॉलिवूड सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना कोरोनाची लागण झाली आहे. भारताच्या गानकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. आताच्या घडीला लता मंगेशकर यांच्याव ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातच लता मंगेशकर यांच्या भगिनी आणि दिग्गज गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी दीदींच्या प्रकृतीविषयी माहिती घेत, यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. लता मंगेशकर यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीसाठी देशभरातून प्रार्थना केल्या जात आहे. लता दीदींना कोरोनाची हलकी लक्षणे असून, वयोमानामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती मंगेशकर कुटुंबीयांकडून देण्यात आली. यानंतर लता दीदींची धाकटी बहीण आशा भोसले यांनी दीदींच्या तब्येतीची विचारपूस केली.
दीदींच्या प्रकृतीत सुधारणा होतेय
रुग्णालयाने ठरवून दिलेल्या वेळाप्रत्रकाप्रमाणे लता दीदींना औषधे देण्यात येत आहेत. दीदींच्या प्रकृतीमध्येही सुधारणा होत आहे. आता अगोदरच्या तुलनेत दीदींची प्रकृती चांगली आहे. आमची बहीण उषा मंगेशकर सातत्याने दीदी आणि माझ्या संपर्कात असून, ती आम्हाला दीदींच्या प्रकृतीची माहिती देत असते, असे सांगत रुग्णालयाच्या नियमाप्रमाणे दीदींना भेटण्याची परवानगी दिली नाही. मी त्यांना भेटण्यासाठी गेले होते. पण, त्यांनी मला भेटण्याची परवानगी दिली नाही, असे आशा भोसले यांनी सांगितले. त्या इ-टाइम्सशी बोलत होत्या.
हे बदलेल्या वातावरणामुळे आहे
कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता रुग्णालयाकडून नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. यादरम्यान माझीही तब्येत काहीशी ठीक नाही. गेल्या काही दिवसांपासून मलाही खोकला आणि सर्दीचा त्रास जाणवत आहे. पण हे बदलेल्या वातावरणामुळे आहे. मला कोरोनाची लागण झालेली नाही, अशी माहिती आशा भोसले यांनी दिली.
दरम्यान, गानसम्राज्ञी लता मंगेशकर सध्या आयसीयूमध्ये आहेत. पण त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे, अशी माहिती दीदींवर उपचार करत असलेले डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिली होती. तसेच लता मंगेशकर यांची भाची रचना यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती ठीक आहे, त्यांचे वय लक्षात घेता खबरदारीच्या कारणास्तव त्यांना रुग्णालयात आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.