मुंबई: भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे (Lata Mangeshkar) यांचे ०६ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले. यानंतर संगीत क्षेत्रासह संपूर्ण जग स्तब्ध झाले. जगासह संपूर्ण मंगेशकर कुटुंबीयांवरही हा मोठा आघात होता. मात्र, यानंतर लता दीदींच्या स्मारकावरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. या संदर्भात राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले. मात्र, या सर्व घडामोडींनंतर लता मंगेशकर कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
लता मंगेशकर यांचे बंधू ज्येष्ठ गायक, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारतरत्न लता मंगेशकर म्हणजे आमची दीदी केवळ आमची नाही तर सर्व जगताची दीदी. तिच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे, ती आकाशाएवढी नाही, तर अवकाशाएवढी आहे. या अवकाशाच्या पोकळीत साक्षात अनेक गंगा जरी ओतल्या तरी ती पोकळी भरून निघणारी नाही, या शब्दांत हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते एबीपी माझाशी बोलत होते.
लता दीदींचे स्मारक शिवाजी पार्कवर होण्याची इच्छा नाही
लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून वाद सुरू आहे. आम्ही मंगेशकर कुटुंबीयांनी या वादात भाग घेण्याचे काही कारण नाही. आमची ती इच्छा नाही की, दीदींचे स्मारक शिवाजी उद्यान येथे व्हावे. याउलट आमचे म्हणणे आहे की, शिवाजी उद्यानाच्या स्मारकावरून जो राजकारणी लोकांचा वाद चालले आहे. तो वाद त्यांनी कृपया बंद करावा आणि दीदींच्या बाबतीत कोणतेही राजकारण करू नये, असे हृदयनाथ मंगेशकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
संगीत विद्यापीठ हीच खरी श्रद्धांजली
महाराष्ट्र शासनाने लता मंगेशकर संगीत विद्यालय स्थापन करण्याच्या निधीला आश्वासन दिले होते. ती विनंती स्वतः लता दीदींनी त्यांना केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री उदय सामंत, आदित्य ठाकरे यांनी ती अतिशय आनंदाने मान्य केली होती. त्याची सर्व पूर्व तयारी त्यांनी केलेली आहे. त्यामुळे दीदींचे एक संगीत स्मारक होत आहे. त्यापेक्षा अन्य कोणतेही मोठे स्मारक होऊ शकत नाही. श्रद्धेला श्रद्धांजली वाहण्याची आवश्यकता नसते. लता मंगेशकर यांच्या निधनाने एक पर्व संपले आहे. एक पर्व नाही, तर एक युगांत झाला आहे, या शब्दांत हृदयनाथ मंगेशकर यांनी आपले मत स्पष्टपणे मांडले.
दरम्यान, लता मंगेशकर यांच्या हयातीत त्यांच्याच इच्छेवरून महाराष्ट्र शासनाने संगीत महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. यासंदर्भातील कामही सुरू केले होते. पण, विद्यापीठाने त्यावेळी काही कारणे देत आम्हाला ते शक्य नाही, असे पत्र आम्हाला पाठवले होते. आमचा आराखडा पूर्ण झाल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू, असेही सांगितले होते, अशी प्रतिक्रिया मंगेशकर कुटुंबीयांचे स्नेही मयुरेश पै यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली.