मुंबई : प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांना दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती त्यांची भाची रचना यांनी एएनआयला दिली आहे.
लता मंगेशकर यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. सध्या त्या 92 वर्षांच्या आहेत.
लता मंगेशकर यांची भाची रचना यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती ठीक आहे, त्यांचे वय लक्षात घेता खबरदारीच्या कारणास्तव त्यांना रुग्णालयात आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.
लता मंगेशकर या देशातील गानकोकिळा म्हणून ओळखल्या जातात. त्यांची प्रत्येक गाणी सदाबहार आहेत. त्यांना प्रत्येक गायक आपला आदर्श मानतो. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायिली आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
लता मंगेशकर यांनी फक्त हिंदी मराठीच नव्हे तर तब्बल 36 भाषांमध्ये गाणी गायिली आहेत. लता मंगेशकर यांना आपल्या घरातूनच गायनाचा वारसा मिळाला आहे. त्यांनी अवघ्या 5 वर्षाच्या वयात आपल्या वडीलांकडून संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली होती.