विधान परिषद: पाचवी जागा निवडून आणणे भाजपसाठी कठीण, मतांसाठी कौशल्याचा कस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 06:41 AM2022-06-15T06:41:01+5:302022-06-15T06:41:35+5:30

विधान परिषदेच्या पाचव्या जागेवर प्रसाद लाड यांना निवडून आणणे भाजपसाठीही कठीण दिसत असून, त्यांना किमान मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.

Legislative Council election It is difficult for BJP to get elected for the fifth seat | विधान परिषद: पाचवी जागा निवडून आणणे भाजपसाठी कठीण, मतांसाठी कौशल्याचा कस

विधान परिषद: पाचवी जागा निवडून आणणे भाजपसाठी कठीण, मतांसाठी कौशल्याचा कस

Next

मुंबई :

विधान परिषदेच्या पाचव्या जागेवर प्रसाद लाड यांना निवडून आणणे भाजपसाठीही कठीण दिसत असून, त्यांना किमान मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. अपक्ष, लहान पक्ष व मोठ्या पक्षांचे क्रॉस व्होटिंग यावर भाजपची मदार असेल, असे म्हटले जाते. 

भाजपचे स्वत:चे संख्याबळ १०६ आहे. त्यांना सात अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपला पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली होती. शिवसेनेच्या एका आमदाराचे निधन झाले आहे. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मताधिकार मिळाला नाही तर २८५ विधानसभा सदस्य राहतात. 

त्या परिस्थितीत पहिल्या पसंतीच्या मतांचा एका जागेसाठीचा कोटा २६ असेल. देशमुख, मलिक यांना मताधिकार मिळाला तर कोटा २७ इतका असेल. 
२६ चा कोटा गृहीत धरला तरी पाच उमेदवारांना निवडून आणण्यासाठी भाजपला १३० मते लागतील. २७ चा कोटा असेल तर १३५ मते लागणार आहेत. राज्यसभेपेक्षा दहा ते बारा मते भाजपला जास्त लागणार आहेत. पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे 

चार उमेदवार निवडून आणताना भाजपला १०४ मते लागतील आणि तंतोतंत तेवढीच मते देण्याऐवजी चारपाच मते अधिक देऊन चार उमेदवारांचा विजय सुनिश्चित करण्यावर भाजपचा भर असेल. अर्थात दुसऱ्या पसंतीच्या मतांवरही भाजपची मदार असेल. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मतव्यवस्थापन कौशल्याचा पुन्हा कस लागेल. 

पहिल्या पसंतीची आठ ते दहा मतेच उरणार
राज्यसभेच्या वेळी भाजपला मिळालेली १२३ मते लक्षात घेता  पाचव्या उमेदवाराला (प्रसाद लाड) देण्यासाठी भाजपकडे पहिल्या पसंतीची फार तर आठ ते दहा मते उरतील. पक्षासाठी ही मोठी डोकेदुखी आहे. राज्यसभा निवडणुकीत आपल्याकडील मतांपेक्षा बाहेरची मते मिळविण्याबाबत भाजपची स्पर्धा ही शिवसेनेशी होती. या वेळी ती काही प्रमाणात राष्ट्रवादीशी आणि मोठ्या प्रमाणात काँग्रेसशी असेल.

Web Title: Legislative Council election It is difficult for BJP to get elected for the fifth seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.