मुंंबई : शिवसेनेचे समर्थक असलेल्या आमदारांना राष्ट्रवादी व काँग्रेसचे बडे नेते फोन करून आपल्या उमेदवारांना विधान परिषद निवडणुकीत मते देण्याची विनंती करीत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत अपक्षांवरून रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र समोर आले. ‘हो! आम्ही अपक्ष आमदारांना फोन केले, काँग्रेसच्या नेत्यांनीही केले आणि त्याची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेली आहे’, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.मी स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोललो. शिवसेनेचे ५५ आमदार आहेत. त्यांच्यासोबत पाच-सहा अपक्षही आहेत. स्वत:च्या बळावर शिवसेनेचे दोन उमेदवार जिंकू शकतात. म्हणून त्यांच्यासोबतच्या अपक्ष आमदारांना मते देण्याची विनंती केली. स्वतंत्र विचाराचे जे आहेत त्यांना भेटून मत मिळवणे, हे उमेदवाराचे आणि पक्षाचे काम असते. काही अपक्षांनी उद्धव ठाकरे सांगतील त्यांना आम्ही मतदान करू, असे आम्हाला सांगितले. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनीही मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली आहे. पहिल्या व दुसऱ्या पसंतीची मते आपापल्या पक्षांना दिल्यानंतर तिसऱ्या, चौथ्या पसंतीक्रमासाठी मित्र पक्षांच्या उमेदवारांना मतदान केले जाऊ शकते, असे पवार म्हणाले.
अपक्षांना सोबत घेऊन आकडा गाठूराज्यसभेत तिन्ही पक्षांकडे काही मते शिल्लक होती. त्यामुळे एकत्र बसून निर्णय घेणे गरजेचे होते; परंतु आता शिवसेनेला दोन उमेदवार निवडून आणायचे आहेत. संख्याबळानुसार ते निवडून येतील, असे चित्र आहे. आम्हाला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी काही संख्या कमी पडतेय. त्यामुळे अपक्षांना सोबत घेऊन आकडा गाठण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.त्याकडे लक्ष देऊ नकाशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या आरोपामुळे चिडलेले अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी राऊत यांनाच माझा मताधिकार देऊनटाका, अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली होती. त्याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, उगाच पराचा कावळा करू नका. अशा गोष्टींकडे लक्ष द्यायचे नसते.
केंद्रीय यंत्रणांकडून आमदारांवर दबाव : पटोले विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी, त्यांना भीती घालण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा सर्रास गैरवापर सुरूअसून, विधान परिषद निवडणुकीतही या यंत्रणांच्या माध्यमातून आमदारांवर दबाव टाकला जात आहे.आमदारांना थेट फोन केले जात आहेत, असा आरोपकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी केला. याची सर्व माहिती आमच्याकडे असून, वेळ आली की ही माहिती समोर आणू, असे ते म्हणाले. केंद्रातील भाजप सरकार सीबीआय आणि ईडीचा हत्यार म्हणून वापर करीत असून, हे लोकशाहीसाठी घातक आहे. सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आघाडीत बिघाडी झाल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत; परंतु बिघाडी आघाडीत नाही, तर भाजपमध्ये दिसत आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून अडथळे निर्माण केले जात आहेत; परंतु आकड्यांचे गणित हे महाविकास आघाडीच्या बाजूने आहे, असा दावा पटोले यांनी केला. दरम्यान, कोणाकडून दबाव येत असल्याची तक्रार एकाही आमदाराने माझ्याकडे केलेली नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात स्पष्ट केले.
भाजपला २२ मतांची गरजकाँग्रेसला दुसऱ्या जागेसाठी ८ मतांची आवश्यकता आहे, तर भाजपला पाचव्या उमेदवारासाठी २२ मते लागतात. तरीही पैसा व केंद्रीय तपास यंत्रणांच्या भरवशावर भाजप विजयाचा दावा करीत आहे, तो यावेळी चालणार नाही. महाविकास आघाडी भक्कम असून, आवश्यक असलेले संख्याबळ मविआकडे असल्याने मविआचे सहाही उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला.
नाना पटोले यांना २० जूनच्या निकालाचा अंदाज आल्याने ते आतापासूनच पराभवाची कारणे शोधत आहेत. पराभवाची स्क्रिप्ट तयार करण्याचा हा प्रकार आहे. ही एक बोगस स्क्रिप्ट आहे. त्यांच्याकडे खरेच काही माहिती असेल तर ती त्यांनी माध्यमांना द्यावी. - चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजप.