ठाणे - मुंबई शिक्षक , मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदार संघांच्या निवडणुकीसाठी आजपासून नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार आहे. ७ जूनपर्यंत हे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप आयुक्त ( सामान्य प्रशासन), पहिला मजला, कोकण भवन, बेलापूर येथे सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत स्वीकारण्यात येतील असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.
प्राप्त अर्जांची छाननी ८ जून रोजी होऊन ११ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येतील. २५ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ पर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून त्याचे काटेकोर पालन करण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त हे या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तर उप आयुक्त (सामान्य प्रशासन), ठाणे , रायगड, रत्नागिरी, व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी हे सहायक निवडणूक अधिकारी आहेत.