मुंबई : विधान परिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला २ जागा मिळाव्यात याकरता पक्षाने दबाव वाढवला आहे. त्यासाठी महाविकास आघाडीने सहावा उमेदवार उभा करावा, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी घेतली. महाविकास आघाडीकडे १७२ आमदार असताना चौथी जागा भाजपला का द्यायची असा सवाल काँग्रेसतर्फे केला जात आहे.
विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या नऊ जागांसाठीची २१ मे रोजी होणारी ही निवडणूक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे ती बिनविरोध व्हावी असे प्रयत्न सुरु असताना काँग्रेसच्या भूमिकेमुळे मात्र निवडणूक बिनविरोध होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपला चार, शिवसेनेला दोन राष्ट्रवादीला दोन आणि काँग्रेसला एक जागा अशी वाटणी करून ही निवडणूक बिनविरोध केली जाईल असे म्हटले जात आहे.
काँग्रेसच्या नेत्यांची मात्र याबाबत तीव्र नाराजी आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केले तेव्हा महाविकास आघाडीकडे १६९ इतके संख्याबळ होते. विधानसभा अध्यक्षांचे एक मत आणि आणि नंतर आघाडी सोबत आलेले दोन आमदार असे १७२ संख्याबळ आहे. विधान परिषदेची एक जागा निवडण्यासाठी २९ इतके संख्याबळ लागते. महाविकास आघाडी म्हणून विधानपरिषद निवडणूक लढवली जात असेल तर सहा जागा निवडून आणता येऊ शकतात. कारण त्यासाठी १७४ आमदारांची आवश्यकता आहे व मतदान गुप्त असल्याने एवढी मते मिळवणे कठीण नाही. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यासाठी प्रयत्न केले तर काँग्रेसची दुसरी जागा निवडून येऊ शकते असा तर्क काँग्रेसतर्फे दिला जात आहे.नेत्यांना संधी की शब्द पाळायचा? -भाजपसमोर मोठा प्रश्न !
विधानपरिषदेवर भाजपचे चार जण निवडून जातील असे चित्र आहे. अशावेळी एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या माजी मंत्र्यांना आमदारकी मिळेल का याबाबत चर्चा सुरू झाली आहे. खडसे यांना राज्यसभेवर पाठवावे अशी शिफारसविधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि एकूणच प्रदेश भाजपने पक्षश्रेष्ठींकडे केली होती. प्रदेश भाजपने खडसेंचा धरलेला आग्रह पक्षश्रेष्ठींनी अमान्य केला होता. ज्यांच्या आग्रहाने खडसे यांचे नाव गेल्या वेळी दिल्लीत पाठवण्यातआले होते. त्यांच्यापैकी बहुतेकांना आता खडसे, तावडे, मुंडे व बावनकुळे हे विधान परिषदेवर जावेत असे वाटते. कारण त्यामुळेप्रदेश भाजपमधील असंतोषाचे सूर शांत होतील. तसेच एकाच वेळी लेवा पाटील, मराठा, वंजारी व तेली समाजाला संधी दिल्यासारखे होईल.