मनोहर कुंभेजकर
मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थेमधून येत्या दि १० डिसेंबर रोजी माजी मंत्री रामदास कदम यांच्या रिक्त होणाऱ्या मुंबईच्या जागेवर शिवसेनेतून वरळीचे माजी आमदार सुनील शिंदे यांच्या नावाची आज रात्री उशिरा किंवा उद्या घोषणा होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी महिती दिली आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज रात्री उशिरा परदेशातून येणार असून सुनील शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची माहिती सूत्रांनी दिली.
मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी २०१४ ते २०१९ साली वरळीचे आमदार म्हणून नेतृत्व करणारे माजी आमदार सुनील शिंदे यांनी आपली जागा रिक्त केली होती. त्यामुळे शिवसेनेतून विधानसभेच्या मुंबईच्या जागेवर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे असे वृत्त लोकमतने दिले होते. शिवसेना उपनेते व माजी राज्यमंत्री सचिन अहिर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई,विद्यमान महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव सुरज चव्हाण यांची नावे सुद्धा आधी चर्चेत होती.
कोण आहेत सुनील शिंदे?
सुनील शिंदे हे २००७ ते २०१२ या काळात पालिकेत शिवसेनेचे नगरसेवक होते.तसेच दोन वेळा प्रभाग समिती अध्यक्ष व एक वेळा ते बेस्ट समितीचे अध्यक्ष होते.२०१४ साली त्यांना शिवसेनेने वरळी विधानसभा मतदार संघातून तिकीट दिले होते. यावेळी त्यांनी माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांचा पराभव केला होता. २०१९ साली पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी त्यांनी वरळीची जागा सोडली होती. शिवसेनेत अनेक इच्छुक असले तरी शेवटी कोणाला तिकीट द्यायचे याचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील असंही सांगण्यात येत आहे.