मुंबई - आमदार अपात्रता आणि सत्तासंघर्षाच्या निकाल वाचनाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सुरुवात केली असून सुरुवातीलाच त्यांनी ठाकरे गटाला धक्का देणारे निर्णय जाहीर केले. तसेच, अगोदर खरी शिवसेना कोणाची हे मी सांगेन, कोणाचा पक्ष खरा हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष म्हणून मला असल्याचंही त्यांनी म्हटलं. दरम्यान, शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. भरत गोगावले यांचा व्हीप खरा मानण्यात आला असून सुनिल प्रभू यांचा व्हीप अध्यक्षांनी नाकारला आहे. अध्यक्षांनी अगोदर शिवसेना कोणाची हा निर्णय दिला. त्यानंतर, आमदार अपात्रेबाबतही निर्णय जाहीर केला. त्यानुसार, सर्वच आमदारांना पात्र ठारलं आहे. त्यामुळे, कोणीही आमदार अपात्र झाला नाही.
राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून आम्हाला घटना प्राप्त न झाल्याने ती निवडणूक आयोगाकडून घेण्यात आल्याचेही सांगितलं. नार्वेकर यांनी सुरुवातील सर्वोच्च न्यायालय, दोन्ही बाजुचे वकील आणि विधानसभा अधिकाऱ्यांचे आभार मानले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास निकाल वाचनाला सुरुवात झाली. साऱ्या राज्याच्या नजरा निकालाकडे लागल्या होत्या. त्यानुसार, विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. शिंदेचा गट हीच खरी शिवसेना असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी त्यांनी पक्षप्रमुख म्हणून सर्वस्वी अधिकार कोणालाही देता येणार नाही, असेही म्हटले. अध्यक्षांचा हा निर्णय शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातो. आता, आमदार अपात्रतेसंदर्भातही निर्णय जाहीर केला. त्यानुसार, दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरले असून कोणीही आमदार अपात्र असणार नाही. त्यामुळे, कुठल्याही आमदाराची आमदारकी जाणार नाही. दरम्यान, निकालाची प्रत सर्वांना दिली जाणार असल्याचेही नार्वेकरांनी स्पष्ट केले.
अध्यक्षांच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून मुंबईतील शिवसेना भवन आणि मातोश्रीबाहेर शिवसैनिक एकत्र जमले आहेत. दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांसह शिवसेना समर्थकांनी जल्लोष व आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाकडे राजकीय पक्षांसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. कारण आजच्या निकालावर महाराष्ट्रातील पुढची राजकीय गणिते ठरणार आहेत. या निकालाचे लाईव्ह प्रेक्षपण सर्वसामान्य प्रेक्षकांनाही पाहता आले. विधिमंडळाने त्याची सुविधा सर्वांना उपलब्ध करून दिली. तत्पूर्वी निकालाआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे प्रतिदावे केले जात आहे. हा निकाल मॅच फिक्सिंग असेल असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.