विधिमंडळ अधिवेशन २५ फेब्रुवारीपासून; अंतरिम अर्थसंकल्प २७ रोजी मांडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 07:33 AM2018-12-21T07:33:52+5:302018-12-21T07:34:26+5:30
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपताना शेवटच्या दिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशन हे १८ फेब्रुवारीपासून सुरु होईल.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १८ फेब्रुवारी ऐवजी २५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. तशी विनंती राज्यपालांना करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या अधिवेशनात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प २७ फेब्रुवारीला सादर होणार आहे.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपताना शेवटच्या दिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशन हे १८ फेब्रुवारीपासून सुरु होईल असे विधिमंडळात जाहीर करण्यात आले होते. मात्र, ते आता २५ पासून सुरू करावे, अशी विनंती वित्त विभागाकडून करण्यात आली होती.
केंद्र सरकार संसदेत आपला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार असल्याने राज्य सरकारही संपूर्ण वर्षभाराचा अर्थसंकल्प फेब्रुवारीतील अधिवेशनात सादर करू शकणार नाही. त्यामुळे राज्याकडूनही अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाईल. याआधी २००९ व २०१४ या निवडणूक वर्षात तत्कालीन सरकारनेही अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.
बाळासाहेबांच्या स्मारकासाठी १४ कोटी माफ
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संस्थेला महापौर बंगल्याची जागा हस्तांतरीत करण्यासाठी द्यावे लागणारे मुद्रांक आणि नोंदणी शुल्क माफ करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. ही जागा महापालिकेकडून स्मारक संस्थेला ३० वर्षांच्या लिजवर देण्यात येणार आहे. या हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्कापोटी १४ कोटी ४१ लाख रुपये तर नोंदणी शुल्कापोटी ३० हजार रुपये हे संस्थेला भरावे लागले असते.