Join us

खाकीतल्या बाबाचा आदर्श ठेवून लेकीची कोविड रुग्णासाठी धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:06 AM

रक्तदानामुळे वृद्धेला मिळाले जीवदानमनीषा म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या काळात पोलीस आपल्या जीवाची पर्वा न करत ...

रक्तदानामुळे वृद्धेला मिळाले जीवदान

मनीषा म्हात्रे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या काळात पोलीस आपल्या जीवाची पर्वा न करत कार्यरत आहेत. यातच कर्तव्यापलीकडे जात राज्य दहशतवादविरोधी पथक, नागपाडा येथे कार्यरत असलेल्या बलराज गणपत साळोखे यांनी ४५ हून अधिक वेळा रक्तदानाचा हक्क बजावून अनेकांचे जीव वाचवले आहेत. दरम्यान, बॉम्बे रुग्णालयात दाखल असलेल्या एका कोरोनाबाधित वृद्धेला रक्ताची आवश्यकता असल्याचा कॉल साळोखे यांच्या मोबाइलवर धडकला. पण ते नुकतेच लसीकरण करून आल्यामुळे रक्तदान करणे शक्य नव्हते. त्यांनी मुलीकडे विचारणा करताच तिने क्षणाचाही विचार न करता तत्काळ वडिलांसोबत बॉम्बे रुग्णालय गाठून रक्तदान केले. तिच्या रक्तदानामुळे वृद्धेचा जीव वाचला.

खाकीतले रक्तदाते म्हणून ओळख असलेले बलराज १९९६ मध्ये मुंबई पोलीस दलात रुजू झाले. सशस्त्र पोलीस दल, अंधेरी पोलीस ठाणे, गुन्हे शाखा अशा विविध पोलीस ठाण्यात उल्लेखनीय सेवा बजावल्यानंतर २०१७ पासून ते एटीएसमध्ये कार्यरत आहेत. सामाजिक बांधिलकीतून २००८ पासून त्यांनी रक्तदान करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत ४५ हून अधिक वेळा रक्तदान केले. यात, कोरोनाच्या पहिल्या लाटेत कुठे रक्ताअभावी शस्त्रक्रिया रखडली, तर कुठे थॅलेसेमिया, ब्लड कॅन्सरसारख्या रुग्णासाठी रक्ताची असलेली आवश्यकता लक्षात घेत त्यांनी २८ एप्रिल, २६ नोव्हेबर, २५ ऑगस्ट रोजी असे ३ वेळा रक्तदान केलेे.

‘तुमची १० मिनिटे एखाद्याचे आयुष्य वाचवू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने पुढे येऊन रक्तदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे,’ असे आवाहन त्यांनी केले आहे. रक्तदानानंतर असलेली सुट्टीही न घेता ते कर्तव्यावर हजर असतात.

गेल्या आठवड्यात कोरोनावरील लस घेऊन ते नुकतेच घरी आले, त्यातच बॉम्बे रुग्णालयात दाखल असलेल्या एका वृद्धेला रक्ताची तत्काळ आवश्यकता असल्याचा कॉल आला. मात्र लसीकरणामुळे लगेच रक्तदान करणे शक्य नव्हते. त्यांनी मुलगी केतकीला रक्तदानाबाबत विचारणा केली. तिनेही क्षणाचाही विलंब न करता होकार दिला आणि दोघेही बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले. केतकीने १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदाच रक्तदानाचा हक्क बजावला. तिच्या रक्तदानामुळे कोरोनाबाधित वृद्धेला जीवदान मिळाले. रक्तदानानंतर तिच्या चेहऱ्यावरही बाबांसारखे समाधानाचे हास्य होते. तिनेही नियमित रक्तदान करण्याचे ठरवले आहे. बारावीमध्ये ९१ टक्क्यांनी बाजी मारून उत्तीर्ण झालेली केतकी सध्या सीएचा अभ्यास करत आहे.

* देहदानाचा निर्णय

आयुष्यभर सर्वांची सेवा केल्यानंतर मृत्यूनंतरही आपल्यामुळे कोणाला काही मदत झाल्यास तेवढेच समाधान मिळते, म्हणून बलराज यांनी आपल्या मृत्यूनंतर देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस तसेच एटीएसकडून त्यांच्या या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला आहे. आतापर्यंत ८३ बक्षिसे त्यांना मिळाली आहेत. तसेच विविध संस्थांनीही सत्कार केला आहे.

.................................