नामदेव मोरे
नवी मुंबई : राज्यभर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये लिंबांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबईत आवक निम्यावर आली असून होलसेल मार्केटमध्ये लिंबू ५० ते ७० रुपये किलो दराने विकले जात आहे. किरकोळ मार्केटमध्ये हलक्या प्रतीचे लिंबू ७ व उत्तम प्रतीचे एक लिंबू १० रुपयांना विकले जात आहे.
लिंबूच आरोग्यविषयी महत्त्व लक्षात आल्यामुळे मुंबई, नवी मुंबईकरांच्या रोजच्या आहारात लिंबूचा वापर वाढला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन २० टनपेक्षा जास्त लिंबूची विक्री होत असते. या आठवड्यात राज्यभर मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे त्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. मुंबईत जालना, बुलडाणा, अहमदनगर, अकोला या जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात लिंबांची आवक होत असते. प्रतिदिन जवळपास २० टन आवक बाजार समितीमध्ये होत असते. मागील काही दिवसांपासून आवक निम्यावर आली आहे. शुक्रवारी बाजार समितीमध्ये १० टन आवक झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये हिरवे लिंबू ५० व पिवळे लिंबू ७० रुपये किलो दराने विकले जात होते. किरकोळ मार्केटमध्ये एक लिंबू ७ ते १० रुपयांना विकले जात आहे.
दसऱ्यापर्यंत थांबादसऱ्यापर्यंत लिंबू मार्केटमध्ये काही प्रमाणात तेजी राहण्याची शक्यता आहे. दसऱ्यादिवशी दक्षिणेकडील राज्यातून लिंबूची आवक सुरु होईल. दसऱ्यादिवशी मुहूर्तावर दक्षिणेतून आवक सुरू होते. त्यानंतर लिंबाचे दर स्थिर होतील.