मुंबई : कॉल सेंटर थाटून व्हीओआयपी कॉलद्वारे अमेरिकेतील रहिवाशांना प्रतिबंधित औषधांची विक्री करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. कॉल सेंटर उद्ध्वस्त करत गुन्हे शाखेने ८ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.इकरामा नासीर मुकादम (२६), अरबाज उर्फ अयान गफार शेख (२०), शहारूख युनुस अन्सारी (२०), जुनेद सलीम शेख (२२), कदीर अब्दुला सय्यद (२०), अतिफ अस्लम शेख (२०), आहाद अब्दुल खान (२०) आणि सलमान अब्दुल मोगनी (२३) अशी अटक आरोपींची नावे आहेत.कुर्ला पश्चिमेकडील सारा बिझनेस सेंटरमध्ये या टोळीने कॉल सेंटर थाटले होते. याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ५ ला मिळताच त्यांनी घटनास्थळी छापा टाकला. तपासात ८ जण कॉल सेंटर चालवित असल्याचे आढळले. ते संगणकावर व्हीओआयपी (वॉईज ओवर इंटरनेट प्रोटोकॉल) कॉलद्वारे तसेच संदेशाद्वारे अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधत असत. त्यांना यूएस फार्मसीमधून बोलत असल्याचे सांगून त्यांच्याकडून प्रतिबंधित औषधांची आॅर्डर घेत असत. मात्र प्रत्यक्षात त्यांना औषधांचा पुरवठा न करता फसवणूक करीत होते. गुन्हे शाखेने घटनास्थळावरून १ लॅपटॉप, ११ हार्डडिस्क, १ सर्व्हर, १२ मोबाइल, वायफाय राऊटर आदी साहित्य जप्त केले आहे.अशी करायचे फसवणूकआरोपी गो आॅटो डाईल या पोर्टलचा वापर करून ही यंत्रणा चालवत होते. परदेशात कॉल केल्यानंतर तेथील ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी मॅजिक जॅक गो याद्वारे १ क्रमांक दिला जातो. ग्राहकांनी दिलेले परकीय चलनाचे पेमेंट ते गेटवेद्वारे भारतीय चलनामध्ये वळते करीत असत. ते पैसे कॉल सेंटरमधील आरोपींना मिळत होते.
अमेरिकन नागरिकांना आमिष दाखवून गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 12:55 AM