Join us

आरेत जेष्ठ नागरिकावर बिबट्याचा हल्ला; परिसरातील नागरिकांत घबराट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 10:29 PM

गेल्या दोन महिन्यांतील हा बिबट्याचा नववा हल्ला आहे. यापूर्वी वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात दोन  बिबटे जेरबंद झाले होते. मग त्यांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जंगलात दूर सोडून देण्यात आले होते.

मुंबई - आरेत गेली तीन आठवडे बिबट्याचे हल्ले थांबले होते. मात्र, आज सायंकाळी आरे युनिट नं. 4 येथे एका बिबट्याने बळवंत यादव या जेष्ठ नागरिकावर हल्ला केला. त्यांना जोगेश्वरी पूर्व येथील बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर येथे दाखल करण्यात आले आहे.  विभागातील शिवसैनिक कुप्पा स्वामी त्यांच्या सोबत गेले होते.

गेल्या दोन महिन्यांतील हा बिबट्याचा नववा हल्ला आहे. यापूर्वी वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात दोन  बिबटे जेरबंद झाले होते. मग त्यांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जंगलात दूर सोडून देण्यात आले होते. लोकमत ऑनलाईन आणि लोकमत मधून सातत्याने बिबट्याचे वृत्त देऊन वनखाते आणि राजकीय पक्षांचे लक्ष वेधले आहे.

येथे सुमारे 11 पिंजरे लावले असून वनखाते डोळ्यात तेल घालून  आणि आरेत जागता पहारा ठेवत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशिल आहे. तर बिबट्यापासून कसे संरक्षण करायचे याबद्धल वनखात्याने येथील नागरिकांच्या बैठकासुद्धा घेतल्या असल्याचे सहाय्यक वनअधिकारी गिरीजा देसाई यांनी सांगितले.

आरेतील नागरिकांवर  अजूनही हल्ला करण्याला बिबट्यांना पकडण्यात वनखात्यांला यश आले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना आजही बिबट्याची दहशत आहे. बिबट्या हल्ला करेल का या भीतीने येथील नागरिक, महिला घरातून बाहेर पडत नाही, अशी माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश धुरी यांनी दिली.

टॅग्स :बिबट्याआरे