...तर बिबट्याचे हल्ले थांबतील!

By admin | Published: July 2, 2015 04:29 AM2015-07-02T04:29:32+5:302015-07-02T04:29:32+5:30

बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांची संख्या ३५ वर पोहोचली असतानाच आता उद्यानातील आदिवासी पाड्यांसह लगतच्या सोसायट्यांमध्ये होणारे बिबट्यांचे

Leopard attacks will stop! | ...तर बिबट्याचे हल्ले थांबतील!

...तर बिबट्याचे हल्ले थांबतील!

Next

मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांची संख्या ३५ वर पोहोचली असतानाच आता उद्यानातील आदिवासी पाड्यांसह लगतच्या सोसायट्यांमध्ये होणारे बिबट्यांचे हल्ले थांबविण्यासाठी जनजागृती अभियान हाती घेण्यात येणार आहे. उद्यानाच्या वतीनेच हे अभियान हाती घेण्यात येणार असून, परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांसह निसर्गमित्रांनी अभियानाबाबत उद्यान प्रशासनाला काही उपायही सुचविले आहेत. या उपायांचा मार्ग अवलंबिला तर निश्चित बिबट्यांचे हल्ले थांबतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया आणि वाइल्ड लाइफ कन्झर्व्हेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने डिसेंबर २०१४ ते जून २०१५ या कालावधीत करण्यात आलेल्या अभ्यासांती उद्यानात ३५ बिबटे असल्याची माहिती समोर आली. बिबट्यांची संख्या वाढल्याचे वृत्त आनंददायक असले तरीही बिबट्यांच्या हल्ल्याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी भीती व्यक्त केली.
गोरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील कुमरे यांनी सांगितले की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एकूण ११ आदिवासी पाडे आहेत. आदिवासी पाड्यांची लोकसंख्या दीड ते दोन हजारांच्या घरात आहे. आदिवासी पाड्यांमध्ये अजूनही वीज नाही. परिणामी आवश्यक ठिकाणी दिव्यांची व्यवस्था नाही. येथे विद्युत पुरवठा करण्याबाबत कोणतेच प्रशासन सकारात्मक प्रतिसाद देत नाही. विद्युत पुरवठ्याचे काम आमचे नाही, असे म्हणत महापालिका प्रशासन हात वर करत आहे. आरे प्रशासन दाद देत नाही. येथे किमान दिवे बसविले तर रात्रीच्या वेळी नागरिकांना थोडे तरी सुरक्षित वाटेल. दुसरे असे की आदिवासी पाड्यांच्या संरक्षक भिंतीबाबत प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे. शिवाय आवश्यक ठिकाणी पिंजरे बसविण्याची गरज आहे.
निसर्गमित्र विजय अवसरे यांनी सांगितले की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत ज्या झोपड्या वसलेल्या आहेत; त्यातील काही ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही. अशा वेळी येथील नागरिक शौचासाठी लगतच्या जंगलाचा आधार घेतात. आणि ज्या सावजाची उंची कमी दिसते; अशा सावजावर बिबट्या प्रामुख्याने हल्ला करतो. अशा घटना यापूर्वी उद्यानाच्या पूर्व उपनगरातील सीमाभागात घडल्या आहेत. परिणामी महापालिकेने संबंधित ठिकाणी शौचालये बांधून दिली तर भविष्यात नक्कीच बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण १० ते १५ टक्क्यांनी कमी होईल. दुसरे असे की, जंगलातील प्राण्यांचे प्रमाण कमी आहे आणि उद्यानालगत भटक्या कुत्र्यांचे प्रमाण अधिक आहे. परिणामी भटक्या कुत्र्यांच्या शोधात बिबट्याचे उद्यानालगतच्या परिसरातील वावराचे प्रमाण अधिक आहे.
वन अधिकारी संतोष सस्ते यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, १८ आॅक्टोबर २०१३ रोजी बिबट्याचा शेवटचा हल्ला झाला होता. त्यानंतर बिबट्याने हल्ला केलेला नाही. तरीही बिबट्यांच्या हल्ल्यासंदर्भात आता उद्यानातील आदिवासी पाड्यांवर अधिक जनजागृती केली जाणार आहे. शिवाय उद्यानालगत ज्या सोसायट्या आहेत; तेथेही यासंदर्भात जनजागृती केली जाणार आहे. मुंबई तसेच ठाणे महापालिका, वन विभाग यांची मदत घेण्यात येणार आहे. उद्यानाचे मुख्य प्रवेशद्वार आणि विहार गेटसह उर्वरित तीन ठिकाणी गस्तीसाठीची चौकी आहे. शिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वापर होत आहे. मोबाइल स्कॉडसह रेस्क्यू टीमचीही मदत घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Leopard attacks will stop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.