बिबट्या, सांबराचा मृत्यू; चित्रनगरीमध्ये रक्षकांच्या गस्ती फेऱ्या वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 05:24 AM2019-01-04T05:24:30+5:302019-01-04T05:24:38+5:30
गोरेगाव फिल्मसिटीमध्ये बिबट्या, सांबराचे आढळलेले मृतदेह आणि २८ वायर ट्रॅप यांची गंभीर दखल घेत वनविभाग आणि चित्रनगरी सुरक्षा यंत्रणा यांची गुरुवारी बैठक झाली.
मुंबई : गोरेगाव फिल्मसिटीमध्ये बिबट्या, सांबराचे आढळलेले मृतदेह आणि २८ वायर ट्रॅप यांची गंभीर दखल घेत वनविभाग आणि चित्रनगरी सुरक्षा यंत्रणा यांची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत चित्रनगरीमध्ये सुरक्षारक्षकांच्या गस्ती फेºया वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महामंडळाच्या अंतर्गत परिसरात दोन आदिवासी पाडे असून पाच आदिवासी पाडे महामंडळाच्या परिसराच्या सीमेलगत आहेत. त्यामुळे चित्रीकरणाशी संबंधित व्यक्तीशिवाय इतर व्यक्तींनाही महामंडळाच्या परिसरात प्रवेश द्यावा लागतो. महामंडळाचा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत आहे. त्यामुळे बिबटे व अन्यजीव येथे संचार करतात. मानव अणि वन्यजीव संघर्ष टाळण्याच्या दृष्टीने महामंडळाच्या परिसरात वन विभागाचे कर्मचारी अधूनमधून गस्त घालतात. महामंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेमार्फतही या परिसराची काळजी घेण्यात येते. चित्रनगरी महामंडळाचे १७ आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १०७ असे एकूण १२४ सुरक्षारक्षक येथे तैनात आहेत.
ठाणे वनविभागाचे उपवन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले की, चित्रनगरी परिसरात गस्त घालण्यासाठी नव्या टीमची नियुक्ती करण्यात येणार आहे. कित्येक मालिका आणि चित्रपटांच्या सेटवर अन्नपदार्थ आणि कचरा चित्रीकरण करणाºयांकडून टाकला जातो. त्यावरही आता कारवाई करणार आहे. तसेच जंगल परिसरात अजून काही सापळे आहेत का, याचा शोध सुरू आहे. फिल्मसिटीचे मुख्य सुरक्षा अधिकारी अशोक जाधव यांनी सांगितले की, संबंधित प्रकरणाचा तपास लागावा आणि संबंधित गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी हालचाली सुरू आहेत. बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले की, बिबट्या मादी आणि सांबराचे शवविच्छेदन प्रक्रिया करण्यात आली आहे. वन्यजीवांचे अवयव पुढील वैद्यकीय तपासणीसाठी ठाणे येथील उपवनसंरक्षक यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.
झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव
पुढील काळात अनुचित घटना येथे घडू नये, यासाठी वन विभागाच्या वतीने चित्रनगरी महामंडळाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.
चित्रनगरीत असणाºया झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव संबंधित प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला आहे.
सुरक्षा भिंत झाल्यावर अटकाव
महामंडळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीमेलगत सुरक्षा भिंतीचे काम दोन टप्प्यांत करण्यात येत आहे. हेलिपॅड ते व्हिसलिंगवूड मैदान या परिसराची सुरक्षा भिंत बांधण्यासाठी महामंडळाला तांत्रिक मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रिया करण्याची कार्यवाही सुरू आहे.
व्हिसलिंगवूड मैदान ते संतोषनगरपर्यंत भिंत बांधण्याचा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आला आहे. सुरक्षा भिंतीचे काम पूर्ण झाल्यावर आरे तसेच रॉयल पाम बाजूने अनधिकृत पद्धतीने प्रवेश करणार नाही.