दिंडोशीतील न्यू म्हाडा बंगल्यात शिरला बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:11 AM2021-08-17T04:11:27+5:302021-08-17T04:11:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: दिंडोशीतील न्यू म्हाडामध्ये रविवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास बिबट्याचे दर्शन घडले. इतकेच नव्हे तर बिबट्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: दिंडोशीतील न्यू म्हाडामध्ये रविवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास बिबट्याचे दर्शन घडले. इतकेच नव्हे तर बिबट्याने बंगल्याच्या छतावर उडी मारल्याने नागरिक भयभीत झाले होते. न्यू म्हाडा वसाहतीत बिबट्याचा वारंवार मुक्त संचार होत असल्याने वनखात्याने ठोस कारवाई करावी. तसेच अनेक महिने या परिसरात मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला पिंजरे लावून जेरबंद करावे आणि येथील भटक्या कुत्र्यांना पालिकेने आवर घालावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
दि. १५ ऑगस्ट रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास येथील रॉयल हिल्स सोसायटी मधील ४४/B या बंगल्याच्या गच्चीवर बिबट्याने उडी मारली. त्यानंतर शेजारीच असलेल्या ४४/A 'आईसाहेब' या बंगल्याच्या छतावर उडी घेऊन मागील जंगलात पसार झाला. या प्रकाराने भयभीत झालेल्या रहिवाशांनी एकत्र येऊन बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न सुरु केला.
दरम्यान या प्रकारची दखल घेऊन ॲड. डाॅ. निलेश वैजयंती भगवान पावसकर यांनी संचालक वनविभाग यांना तातडीने कळविताच वनविभागातर्फे सर्च टीम पाठविण्यात आली. सदर टीमने पाहणी केली असता त्यांना वाघाचे ठसे आढळून आले आहेत.
दरम्यान सुरक्षिततेसाठी जवळपास असलेल्या सर्व सोसायटींचे गेट रात्री बंद करण्यात आले होते.
यानंतर वनविभागातर्फे सर्च ऑपरेशन करून बिबट्याची संभाव्य ठिकाणे शोधण्याचा प्रयत्न देखील केला गेला.
लोकमतच्या बातमीची दखल
दि.१४ ऑगस्ट रोजी बिल्डिंग क्रमांक १९ मध्ये मध्यरात्री २.४५ ते २.५३ दरम्यान बिबट्याचा मुक्त संचार होता. बिल्डिंगच्या पार्किंग एरियातून फेरी मारून मुख्य गेट मधून बाहेर पडल्याचे चित्रण सीसीटीव्हीत कैद झाले होते. लोकमत ऑनलाईन आणि लोकमतमध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. बिबट्याचा मुक्त संचार आणि थरार लोकमत ऑनलाईनचे वृत्त आणि व्हिडिओतून सोशल मीडियावर,राजकीय वर्तुळात आणि वन खात्यात व्हायरल झाला. लोकमतच्या बातमीची दखल घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्यापासून संरक्षण कसे करावे याचे सविस्तर मार्गदर्शन येथील नागरिकांना केले होते.