Join us  

भाईंदरच्या उत्तन येथे बिबट्या पिंजऱ्यात सापडला, पिंजरा लावणाऱ्यास घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 8:53 PM

दोन डुकरांची केली सुटका

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: भाईंदरच्या उत्तन व गोराई भागातील जंगलात वावरणारा बिबट्या उत्तन येथील एका इसमाने लावलेल्या सापळा पिंजऱ्यात अडकून जखमी झाला . वन विभागाने जखमी बिबट्याला उपचारासाठी नेले  तर पिंजरा लावणाऱ्यास ताब्यात घेतले असून त्याने बांधून ठेवलेली २ कथित जंगली डुकरं सुद्धा सोडवली आहेत. भाईंदरच्या उत्तनच्या खोपरा , पालखाडी , खाडीवर ह्या भागास लगतच्या मुंबई हद्दीतील गोराईच्या जंगलात गेल्या वर्षभरा पासून बिबट्या वाघाचे दर्शन तेथील आदिवासी व रहिवाशी यांना होत होते . बिबट्याने कोणा मनुष्यावर हल्ला केला नसला तरी कोंबड्या , कुत्री त्याने लक्ष्य केले होते . वन विभागाने परिसराची पाहणी करून निगराणी ठेवली होती . खास कॅमेरे बसवले होते तसेच परिसरातील रहिवाश्यां मध्ये जनजागृती करून काय काळजी घ्याची याची माहिती दिली होती.

दरम्यान पालखाडी भागातील राधिका वृद्धाश्रम मागे फळझाडे  व भाजीपाला लावणाऱ्या डॅनी घोन्साल्विस यांनी त्यांच्या जागेत लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी बिबट्या वाघ अडकल्याचे आढळून आले . बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे कळताच परिसरातील लोकांनी मोठ्या संख्येने बिबट्या पाहण्यासाठी गर्दी केली . अग्निशनम दल , उत्तन पोलीस घटनास्थळी आले . बिबट्याच्या डोक्याला मार लागून तो जखमी झाला होता. बिबट्याचे व्हिडीओ आणि छायाचित्रे काहीवेळातच समाज माध्यमांवर व्हायरल झाली .  तर सदर पिंजरा आपण डुकरां साठी लावलेला होता व त्यात कोंबडीची पिसे व मांस , अवयव आदी ठेवले होते . त्यामुळे बिबट्या आला असावा . पिंजरा युट्युबवर पाहून बनवून घेतला असल्याचे डॅनी याचे म्हणणे होते. वन विभागाला पाचारण केल्या नंतर पथकाने त्यांच्या पिंजऱ्यात बिबट्याला घेऊन उपचारासाठी बोरिवली येथे नेले . बिबट्या मादी जातीचा असून सुमारे ३ वर्षाच्या वयोगटातील असल्याचे सांगण्यात आले . दरम्यान वन विभागाचे परिक्षेत्र वन अधिकारी राकेश भोईर हे पथकासह आले. त्यांनी पडताळणी करून माहिती घेतली असता डॅनी याने २ जंगली डुक्कर पकडून ठेवले असल्याचे  सांगितले .  तर बिबट्याला पकडण्यासाठी बेकायदेशीर पिंजरा लावून त्याला पकडून तो जखमी झाल्या प्रकरणी वन विभागाने डॅनी याला ताब्यात घेत ठाणे येथे नेण्यात आले. वन विभागाने डॅनी याने लावलेला पिंजरा व २ डुक्कर जप्त केली आहेत.

टॅग्स :बिबट्या