एसआरपीएफ कॅम्पच्या जिमखान्यात बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 04:12 AM2018-05-14T04:12:48+5:302018-05-14T04:12:48+5:30

गोरेगाव पूर्वेकडील एसआरपीएफ कॅम्पच्या जिमखान्यात रविवारी सकाळी ८.३०च्या सुमारास बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली.

Leopard in the SRPF Camp Gymkhana | एसआरपीएफ कॅम्पच्या जिमखान्यात बिबट्या

एसआरपीएफ कॅम्पच्या जिमखान्यात बिबट्या

Next

मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील एसआरपीएफ कॅम्पच्या जिमखान्यात रविवारी सकाळी ८.३०च्या सुमारास बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच उपस्थितांनी वनविभागाशी संपर्क साधला. यावर येथे दाखल झालेल्या ठाणे वनविभाग आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रेस्क्यू टीमच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला सकाळी ११च्या सुमारास ताब्यात घेतले.
एसआरपीएफ कॅम्प आरे कॉलनीला लागून असल्याने नैसर्गिक अधिवासातातील प्राणी खाद्याच्या शोधात मानवी वस्तीत येतात. कॅम्प परिसरात लोकांची वस्ती कमी असल्याने बिबट्याला जेरबंद करण्यास रेस्क्यू टीमला फारशा अडचणी आल्या नाहीत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी गुंगीचे इंजेक्शन बिबट्याला मारून बेशुद्ध केले. त्यानंतर या नर बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे.
एसआरपीएफ कॅम्पच्या युनिट ८ येथे बिबट्या दिसून आल्याचा सकाळी ८.३० वाजता फोन आला. ठाणे वनविभागाची टीम आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रेस्क्यू टीम या दोघांनी मिळून साधारण सकाळी ११च्या सुमारास बिबट्याला ताब्यात घेतले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्या रेस्क्यू विभागात त्याला ठेवण्यात आले आहे. हा नर बिबट्या पाच वर्षांचा आहे. सध्या त्याला वनविभागाच्या अखत्यारित ठेवण्यात आले असून, त्याची वर्तणूक पाहून त्याला सोडण्यात येईल, अशी माहिती ठाणे वनविभागाचे उपवन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. या बिबट्यावर वैद्यकीय तपासणी व मायक्रोचिपिंग करण्यात आली. तसेच बिबट्याला कोणत्याही प्रकारची मोठी जखम झालेली नाही. बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी दिली.

Web Title: Leopard in the SRPF Camp Gymkhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.