मुंबई- संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगत असलेल्या न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीतील इमारत क्रमांक 19 गार्डन हिल सोसायटीच्या आवारात आज मध्यरात्री 2.45 ते 2.53 पर्यंत चक्क आठ मिनिटे बिबट्याचा वावर होता. येथील सुनील सरोज या सुरक्षा रक्षकांच्या बाजूने बिबट्या गेल्याने ते तर कमालीचे घाबरले होते. त्यांनी या सोसायटीचे सचिव युवराज गायकवाड, अध्यक्ष रणजित कदम आणि येथील रहिवासी जतीन बजाज, गणेश कदम यांना फोन करून बोलावले. सोसायटीचा सीसीटीव्ही बघितल्यावर आज मध्यरात्री 2.45 ते 2.53 पर्यंत चक्क आठ मिनिटे बिबट्याचा वावर होता हे स्पष्ट झाल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.
लोकमत ऑनलाईन आणि लोकमतमधून सातत्याने येथील बिबट्याच्या वावराचा सविस्तर वृत्तांत आणि यावर मालिका लोकमतने प्रकाशित करून आमच्या समस्या आमदार सुनील प्रभू, वनखाते,पालिका यांच्याकडे मांडल्याबद्धल येथील इमारत क्रमांक 5मध्ये राहणाऱ्या डॉ. रामेश्वरी पाटील यांनी लोकमतला धन्यवाद दिले. येथील बिबट्याच्या वावरावर वनखाते आणि येथील एका बांधकाम व्यवसाईकाने ठोस कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
गेली अनेक महिने बिबट्या येथील भटक्या कुत्र्यांच्या वासाने येथील न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत येत असल्याने येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
शिवसेना विधी मंडळ मुख्य प्रतोद, स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांनी याची दखल घेऊन येथील बिबट्याचा होणाऱ्या वावरावर ठोस कारवाई करण्यासाठी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना येथील परिसरात पिंजरे लावण्यासाठी पाठपुरावा करावा. तसेच येथील बांधकाम व्यवसायिकाने येथील डोंगरात भरणी करून रस्ता केल्याने बिबट्या आता चक्क येथील सोसायटीत येऊ लागला आहे. येथील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी येथील बांधकाम व्यवसाईक आणि वनखात्याला येथे संरक्षक भिंत व तारेचे कुंपण घालण्यासाठी देखिल आमदार प्रभू यांनी वन खात्याशी पाठपुरावा करावा,तसेच पालिकेने येथील भटक्या कुत्र्यांवर आणि त्यांना खाद्य देणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी युवराज गायकवाड यांनी केली.