लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत चक्क रविवारी परत येथील इमारत क्रमांक १९च्या मागील असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सायंकाळी ६ ते ७.३०च्या दरम्यान बिबट्याचा मुक्त संचार होता. येथील मनसेचे प्रभाग क्रमांक ४० चे शाखाध्यक्ष विजय बोरा व इमारत क्रमांक १९ बी/५०१ मध्ये राहणारे अजय लाड यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.
या सोसायटीच्या मागील बाजूस सुमारे १५० ते २०० फूट अंतरावर बिबट्या चक्क कुत्र्याच्या शिकारीसाठी दीड तास इकडे होता. येथील २० ते २५ नागरिकांनी बिबट्याचा मुक्त संचार मोबाईलमध्ये टिपला. लाड यांनी ‘लोकमत’ला सदर व्हिडिओ दिले.
येथील इन्फिनिटी आयटी पार्कलगत असलेल्या न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीतील गिरिराज सोसायटी, इमारत क्रमांक पाचमध्ये १५ जून रोजी दुपारी दीडच्या सुमारास येथील सोसायटीच्या मागील बाजूस बिबट्या कुत्र्याची शिकार घेऊन संरक्षक भिंतीवरून चालत होता; तर त्याआधी तीन दिवस भटकी कुत्री पकडण्यासाठी मध्यरात्री बिबट्या येत होता. आता परत रविवारी पुन्हा बिबट्या येथील मानवी वस्तीजवळ आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.