मुंबई - बोरिवली, भांडुप, मुलुंड आणि ठाण्यासह लगतच्या वस्त्यांमध्ये मुक्त संचार करणाऱ्या बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांनी थेट तुंगारेश्वर अभयारण्यापर्यंत मजल मारली आहे. सावज टिपण्यासह मुक्त संचार करताना बिबट्यांनी घोडबंदरसारखे मोठे आणि छोटे रस्ते सहज पार केले असून, असे असंख्य रस्ते पार करताना बिबट्यांनी अंडरपासचा आधार घेतला. रेल्वे आणि रस्ते ओलांडण्याचा प्रवास बिबट्यांनी शक्यतो रात्री केला असून, मादी बिबट्यापेक्षा नर बिबट्याचा मुक्त संचार अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.
वन विभाग आणि वाइल्ड लाइफ कॉन्झर्व्हेशन सोसायटी-इंडियाच्या वतीने शहरी भागातील बिबट्यांच्या मानवाशी होणाऱ्या परस्परक्रिया समजावून घेण्यासाठी संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आला असून, त्या अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांचा हा अभ्यास करण्यात आला.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबटे जागा आणि वेळेचा उपयोग कसा करतात. मानवाशी त्याच्या परस्परक्रिया कशा असतात. घोडबंदरसारखे मोठे रस्ते आणि महामार्ग ते कशा प्रकारे ओलांडतात हे समजावून घेणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट होते.- मल्लिकार्जुन, संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली
देशातील इतर क्षेत्रांच्या तुलनेत येथील बिबट्यांचे अधिवास क्षेत्र लहान असल्याचे दिसून आले. भक्ष्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याने कदाचित झाले असावे. एका कॉलर लावलेल्या बिबट्याच्या क्षेत्रात जास्तीतजास्त नऊ बिबट्यांच्या नोंदी आढळल्या. एकाच क्षेत्रात वेगवेगळ्या बिबट्यांचा वावर असल्याचे आढळले. - निकित सुर्वे, प्रोग्राम हेड, वाइल्डलाइफ कॉन्झर्व्हेशन सोसायटी - इंडिया
दोन टप्प्यात प्रकल्पऑगस्ट २०२० ते ऑगस्ट २०२२ अशा दोन वर्षांचा हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण करण्यात आला.३ ते ४ महिने निरीक्षण आणि ७०० किमी पायपीटसंशोधकांनी प्रत्यक्ष ऑन फिल्ड टेकिंगद्वारे तीन ते चार महिन्यांपर्यंत बिबट्यांचे निरीक्षण केले. संशोधक, कर्मचारी या माहिती संकलनासाठी ७०० किमी चालले.
बिबट्या किती फिरला : मादी बिबट्याचे क्षेत्र हे नर बिबट्याच्या क्षेत्रापेक्षा कमी आढळले. सर्वात लहान क्षेत्र २.५८ चौरस किमी हे एका मादी बिबट्याचे तर सर्वात मोठे क्षेत्र ८४.२६ चौरस किमी हे एका नर बिबट्याचे आढळले.
अडथळे रात्री पार : महाराजा आणि जीवन हे बिबटे रेल्वे आणि राज्य महामार्गासारखे अडथळे रात्रीच्या वेळी पार करताना आढळले.
दिवसा आराम : बिबटे रात्री अधिक सक्रिय आढळले तर दिवसा ते उद्यानात विश्रांती घेत असल्याची नोंद झाली. माणसाच्या जवळ असूनही... काही प्रसंग असे आहेत ज्यात बिबटे माणसाच्या जवळ असतानाही त्यांना त्याची जाणीव झाली नाही.