न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये पसरली घबराट!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 09:57 PM2020-10-19T21:57:39+5:302020-10-19T21:58:48+5:30
Mumbai: न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीच्या मागे नॅशनल पार्कचा परिसर असल्याने खाद्याच्या शोधात बिबट्या येथे येत असावा अशी माहिती येथील नागरिकांनी दिली.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : गेले 2 -3 दिवस संध्याकाळच्या वेळेस न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत बिबट्याच्या वावरामुळे येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. आज संध्याकाळी 7 च्या सुमारास इमारत क्रमांक 19 न्यू गार्डन हिल सोसायटीच्या कंपाउंड वॉलवरून मांजरीची शिकार करुन बिबट्या येथील लगत असलेल्या म्हाडा बंगल्यात शिरला. येथील 15 डी बंगल्यात राहणाऱ्या गृहिणीने या बिबट्याला बघितले होते. येथील इमारत क्रमांक 19 न्यू गार्डन हिल सोसायटीचे सचिव युवराज गायकवाड यांनी 'लोकमत'ला ही माहिती दिली.
कोरोनामुळे शाळा व महाविद्यालय बंद असल्याने मुले बाहेर खेळत असतात. त्यातच येथे बिबट्या येत असल्याने या मुलांच्या आणि नागरिकांच्या जीवाला धोका असल्याची माहिती गायकवाड यांनी 'लोकमत'ला दिली. वन खात्याने या प्रकरणी जातीने लक्ष देऊन या बिबट्याचा लवकर शोध घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
2017 साली इमारत क्रमांक 5 मध्ये देखिल बिबट्या आला होता. न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीच्या मागे नॅशनल पार्कचा परिसर असल्याने खाद्याच्या शोधात बिबट्या येथे येत असावा अशी माहिती येथील नागरिकांनी दिली. दरम्यान, येथील स्थानिक आमदार,शिवसेनेचे प्रवक्ते सुनील प्रभू यांनी सदर बाब आपण पर्यावरण मंत्री व उपनगर पालक मंत्री आदित्य ठाकरे व वनमंत्री संजय राठोड यांच्याशी बोललो आहे.
तसेच, बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा आणि येथे पिंजरा लावण्यात यावा आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी येथे गस्त घालावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, वनक्षेत्रपाल ( तुळशी ) दिनेश देसले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की,आताच आम्हाला येथे बिबट्या येत असल्याची माहिती मिळाली.उद्या आम्ही येथे भेट देणार असून येथे येणाऱ्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी सर्च लाईट लावणार आहोत.