कमी बोली लावणाऱ्या ठेकेदारांना बसणार चाप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 01:09 AM2018-12-09T01:09:11+5:302018-12-09T01:09:40+5:30
कमी खर्चात केलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे अशा ठेकेदारांवर निर्बंध आणण्यासाठी महापालिका लवकरच नियमावली तयार करणार आहे.
मुंबई : कंत्राट खिशात घालण्यासाठी ठेकेदार अंदाजित खर्चापेक्षा कमी किमतीची बोली लावत आहेत. मात्र कमी खर्चात केलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे अशा ठेकेदारांवर निर्बंध आणण्यासाठी महापालिका लवकरच नियमावली तयार करणार आहे.
कमी किमतीच्या निविदांबाबत कोणताही स्पष्ट नियम नसल्याने ठेकेदार कमी बोली लावू लागले. हे प्रमाण वाढत जाऊन ५० टक्के कमी खर्चात काम करण्याचीही तयारी ठेकेदार दाखवित आहेत. मात्र ठेकेदार खर्च कमी करताना सामानाच्या दर्जात तडजोड केली जात असल्याचे दिसून आले आहे. विशेषत: रस्त्यांच्या कामांत अनियमितता आढळून आल्यानंतर महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. कमी बोलीचे प्रस्ताव अनेक वर्षांपासून सादर होत असले तरी नुकतेच मुंबईत काही ठिकाणी जलवाहिनी टाकण्याच्या पाच प्रकल्पांत ३५ टक्के कमी खर्चाची बोली ठेकेदारांनी लावली. त्यामुळे महापालिकेने पुनर्निविदा मागवली आहे.
जल प्रकल्प, पर्जन्य जलवाहिन्यांची सफाई, रुंदीकरण, उद्यानांच्या कामांमध्ये कमी खर्चाच्या निविदा सादर होत असल्याचे प्रामुख्याने दिसून आले आहे.
छोट्या प्रकल्पांमध्ये समस्या कायम
मोठ्या प्रकल्पांमध्ये कमी बोली लावणाºया ठेकेदारांवर महापालिकेने अंकुश आणला. मात्र छोट्या प्रकल्पांमध्ये ही समस्या कायम आहे.
सायन-कोळीवाडा येथील चार कोटी खर्चाच्या कामासाठी तब्बल ५५ टक्के कमी बोली ठेकेदाराने लावली होती. मोठ्या प्रकल्पांमध्ये कमी बोली लावणाºयांना अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम भरावी लागते.