मुंबई : मुंबईत गेले काही दिवस दमदार पाऊस कोसळला असला तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात अद्याप म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. ५० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा या तलावांमध्ये असल्याने तूर्तास पाणी कपातीचा कोणताही निर्णय मागे घेण्यात येणार नसल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावांत दररोज सरासरी पाऊस पडत असून पाणी साठा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई शहराला सध्या तानसा, मोडक सागर (वैतरणा), हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून पाणी पुरवठा केला जातो. ही धरणे मुंबई शहरापासून १०० किमीपेक्षा जास्त अंतरावर असून केवळ विहार आणि तुळशी हे दोनच तलाव मुंबईत आहेत. मुंबईची दररोजची तहान ही ३८५० दश लक्ष लिटर इतकी असून या तलावात अद्याप म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही त्यामुळे जुलैच्या सुरुवातीला पालिका प्रशासनाने १० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला.
आठवडाभर धो धो पाऊस पडत असला तरी या तलावात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. ७० टक्के पाणीसाठा होत नाही तोपर्यंत पाणीकपात मागे घेण्यात येणार नसल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.