नव्या अभ्यासक्रमात अयोध्येतील राम मंदिरावर धडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 06:30 AM2020-08-07T06:30:45+5:302020-08-07T06:31:24+5:30
एनसीईआरटीची तयारी : स्वातंत्र्यवीर सावरकर, सरदार पटेल, गोपाळ कृष्ण गोखले यांचीही महती सांगणार
एस. के. गुप्ता।
नवी दिल्ली : देशामध्ये नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदींनुसार एनसीईआरटी नवा अभ्यासक्रम तयार करत असून त्यामध्ये अयोध्या येथे बांधण्यात येणाऱ्या राममंदिरावर एक धडा असणार आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान नेते स्वातंत्र्यवीर सावरकर, नामदार गोपाळ कृष्ण गोखले तसेच भारताचे पोलादीपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची महती सांगणाºया धड्यांचाही समावेश केला जाण्याची शक्यता आहे.
अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. आता मंदिराची महती पाठ्यपुस्तकाद्वारे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्याचा मोदी सरकारचा विचार असल्याचे कळते.
नव्या अभ्यासक्रमात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असावा यासंदर्भात विचार करण्याकरिता एनसीईआरटी समित्या नेमणार आहे. त्या समित्यांसमोर आम्ही या सर्व गोष्टी मांडणार आहोत, असे शिक्षा संस्कृती उत्थान न्यासचे राष्ट्रीय सचिव अतुल कोठारी यांनी सांगितले.
उत्तम संस्कार आवश्यक
शिक्षा बचाओ आंदोलन समिती या संस्थेचे पदाधिकारी व शिक्षा संस्कृती उत्थान न्यासचे राष्ट्रीय सचिव अतुल कोठारी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार होणे आवश्यक आहे.
काही आदर्श उदाहरणे त्यांच्यासमोर ठेवली पाहिजेत. रामजन्मभूमीचा वाद सुरू होऊन त्यावर तोडगा निघेपर्यंत सुमारे पाच शतकांचा काळ गेला. हा सर्व इतिहास विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यानुसारच अभ्यासक्रम तयार केला पाहिजे. नवे शैक्षणिक धोरण देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी उपयोगी ठरेल असा विश्वास कोठारी यांनी व्यक्त केला.
संचालकांनी सांगितले की...
एनसीईआरटीचे संचालक डॉ. ऋषिकेश
सेनापती यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, नवीन अभ्यासक्रम पुढील वर्षीपर्यंत तयार केला जाईल.
त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव करायचा यावर विचारमंथन सुरू आहे. अयोध्या येथे बांधण्यात येणाºया राममंदिरावरही या अभ्यासक्रमात एक धडा असेल.
अभ्यासक्रम तयार झाला की, पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी आणखी एक वर्ष लागेल.
२००५ सालानंतर देशात विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रमच तयार करण्यात आला नाही. नवीन अभ्यासक्रम बनविण्यासाठी समित्या नेमल्या जातील.