अभियंते गिरविणार खड्डे भरण्याचे धडे, आयआयटीकडून प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 12:44 AM2019-03-05T00:44:08+5:302019-03-05T00:44:16+5:30

खड्डेमुक्त मुंबईसाठी देशी-परदेशी तंत्रज्ञानाचे प्रयोग फसल्यानंतर महापालिका आता आपल्या अधिकाऱ्यांनाच खड्डे भरण्याचे प्रशिक्षण देणार आहे.

Lessons to be filled by engineers, training from IITs | अभियंते गिरविणार खड्डे भरण्याचे धडे, आयआयटीकडून प्रशिक्षण

अभियंते गिरविणार खड्डे भरण्याचे धडे, आयआयटीकडून प्रशिक्षण

Next

मुंबई : खड्डेमुक्त मुंबईसाठी देशी-परदेशी तंत्रज्ञानाचे प्रयोग फसल्यानंतर महापालिका आता आपल्या अधिकाऱ्यांनाच खड्डे भरण्याचे प्रशिक्षण देणार आहे. आयआयटी मुंबई या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली खड्डे भरण्याबरोबरच रस्त्यांची पुनर्बांधणी, रिर्स्फेसिंग, दुरुस्तीचे धडेही पालिकेचे अभियंते गिरवणार आहेत.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराचे रस्ते दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यात जातात. या खड्ड्यांत पडून वाहनचालकांचे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र कोट्यवधी रुपये खर्च करूनही मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यात महापालिकेला यश आलेले नाही.
गेल्या वर्षी खड्डे भरण्यासाठी अडीच हजार मेट्रिक टन कोल्डमिक्सचे उत्पादन करण्याचा निर्धार महापालिकेने केला होता. मात्र कच्चा माल न मिळाल्यामुळे या प्रक्रियेला विलंब झाला. या वर्षी पावसाळ्यात खड्डे भरण्यासाठी महापालिका १२०० मेट्रिक टन कोल्डमिक्सचे उत्पादन करणार आहे. परंतु कोल्डमिक्स प्रभावी ठरत नसल्याने त्याचा वापर बंद करण्याची मागणी नगरसेवकांकडून होत आहे. त्यामुळे कोल्डमिक्स तंत्रज्ञानाबाबतही वाद सुरू आहे. त्यामुळे अभियंत्यांना खड्डे भरण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
दोन दिवसांच्या या प्रशिक्षणामध्ये काँक्रिट आणि डांबरी रस्त्यांची दुरुस्ती आणि देखभाल, रस्ते पुनर्बांधणी व रिर्स्फेसिंगमध्ये नवीन प्रयोग याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. रस्ते आणि वाहतूक विभागातील दुय्यम अभियंता, साहाय्यक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांना हे प्रशिक्षण मिळणार आहे. त्याचबरोबर मुंबईतील सर्व २४ विभागांमध्ये हमखास खड्ड्यांत जाणाऱ्या रस्त्यांची यादीही तयार करण्यात येत आहे. त्यानुसार या रस्त्यांसाठी कोल्डमिक्स तंत्रज्ञान तयार करण्यात येणार आहे.
>तोडगा काढण्यासाठी चर्चा
पालिका आयुक्त अजय मेहता यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणातून अभियंत्यांना खड्डे भरण्याबाबतचे प्रशिक्षण देण्याचा निर्धार व्यक्त केला होता. जमिनीखाली उपयोगिता सेवांचे जाळे, त्यासाठी सतत खोदले जाणारे चर यामुळे रस्त्यांचे मोठे नुकसान होत असते.
या प्रशिक्षण कार्यक्रमात या समस्येवर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यात येईल. आयआयटीच्या तज्ज्ञांना अनेक शहरे व राज्यांमध्ये काम करण्याचा अनुभव असतो. त्यांचे अनुभव, अभ्यासातून महापालिकेला मार्ग सापडेल, असा विश्वास प्रशासनाला आहे.

Web Title: Lessons to be filled by engineers, training from IITs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.