वर्सोवा : वर्सोवा वेलफेअर असोसिएशन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना सौरऊर्जेचे महत्त्व प्रात्यक्षिकाद्वारे पटवून देण्यासाठी या ऊर्जेपासून मॅगी बनवण्याचा अभिनव उपक्रम घेण्यात आला. रोज वर्गात अभ्यासाचे धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी उन्हात सौरऊर्जेचे धडे घेतले. सोलर कूकरच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनीच तयार केलेल्या मसालेदार मॅगीवर ताव मारला. संस्थेचे अध्यक्ष आणि माजी उपमहापौर अरुण यांनी हे आयोजन केले होते. या वेळी पालिकेच्या विद्यार्थ्यांना सौरऊर्जेचे धडे देण्याचा मानस पालिका शिक्षण समितीचे अध्यक्ष विनोद शेलार यांनी व्यक्त केला. सोलर कूकरचा उपयोग कसा करावा, याचे प्रात्यक्षिक यावेळी विनय नाथानी आणि अनुपम शुक्ला यांनी दिले. सौरऊर्जेच्या प्रात्यक्षिकाने प्रभावित झालेल्या विनोद शेलार यांनी पालिकेत विद्यार्थ्यांसाठी सौरऊर्जेचे धडे देण्यासाठी पुढाकार घेऊ, असे या वेळी सांगितले. अन्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे विपुल सौरऊर्जा असूनही त्याचा अत्यल्प उपयोग होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शाळेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षिका सीमा अहीर यांनी सौरऊर्जेवरील संग्रहित केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. (प्रतिनिधी)
पालिका देणार सौरऊर्जेचे धडे
By admin | Published: February 02, 2015 2:53 AM