- चेतन ननावरे, मुंबईअवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीला फटाके फोडण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. फटाक्यांच्या खरेदीसाठी बाजारात झुंबड उडाली असून, कर्णकर्कश फटाक्यांपेक्षा रोषणाई करणाऱ्या फटाक्यांना अधिक मागणी आहे.दिवसागणिक बाजारातील गर्दी वाढत असून, यंदा बच्चेकंपनीसाठी रंगीबेरंगी फटाक्यांनी बाजार सजला आहे. आवाज करणाऱ्या फटाक्यांहून रोषणाई करणाऱ्या फटाक्यांना ग्राहकांची अधिक मागणी असल्याचे मुंबई आणि ठाणे फायर वर्क्स डीलर्स वेल्फेअर असोसिएशनचे सरचिटणीस मिनेश मेहता यांनी दिली. मेहता यांनी सांगितले की, ग्राहकांकडून मागणीमुळे दुकानात मोठ्या आवाजाच्या फटाक्यांची संख्या १० टक्क्यांहून कमी झाली आहे. याउलट ९० टक्के फटाके हे रोषणाई करणारे आहेत. बाजारात गर्दी असली तरी गेल्या काही वर्षांत त्यात सातत्याने घट होत असल्याची खंतही मेहता यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की वाढती महागाई, शाळांनी कमी केलेल्या सुट्या आणि पालकांकडे असलेला वेळेचा अभाव हे मागणी घटण्यामागील तीन मुख्य कारणे आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १० ते १२ टक्क्यांनी किंमतवाढ झाली आहे; तरीही फटाके खरेदीसाठी गर्दी होत आहे.पारंपरिक फटाक्यांची क्रेज कायम : भूईचक्र, पाऊस, रॉकेट या पारंपरिक फटाक्यांना आजही मागणी असल्याचे मेहता यांनी सांगितले. मात्र उत्पादकांनी त्यात अनेक बदल केले आहेत. भूईचक्र, पाऊस आणि रॉकेटचे उत्पादन करणाऱ्या विविध कंपन्यांनी रंगबेरंगी उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. त्याला बच्चे कंपनीकडून अधिक पसंती मिळत आहे.नियमांचे पालन करासकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी शासनाने दिलेली आहे. तशी माहितीही फटाक्यांच्या बॉक्सवर छापण्यात आली आहे. तरी ग्राहकांनी फटाके फोडण्याआधी या सूचना वाचाव्यात. शिवाय रात्री १० नंतर आणि शाळा, रुग्णालय, न्यायालय अशा शांतता क्षेत्रात फटाके फोडू नये, असे आवाहनही संघटनेने केले आहे.
कर्णकर्कश आवाजाच्या फटाक्यांकडे मुंबईकरांची पाठ !
By admin | Published: November 07, 2015 3:50 AM