Join us

पैजारवाडीचा ‘धनंजय’ जर्मनीत गिरविणार डिझाईनचे धडे

By admin | Published: September 02, 2014 12:23 AM

देशातून एकेमव्य निवड : जागतिक वाहन उद्योगातील डिझायनिंग अभ्यासक्रमासाठी निवड; कोल्हापूरला पहिलीच संधी

संतोष मिठारी - कोल्हापूर --अंगभूत कौशल्याला तंत्रशुद्ध शिक्षणाची जोड देत वाहन उद्योगांतील डिझायनिंगच्या विविध स्पर्धेत कोल्हापूरचा नावलौकिक करणाऱ्या पैजारवाडी (ता. पन्हाळा) येथील धनंजय अनिल चिले याची जर्मन सरकारकडून ‘मास्टर आॅफ आर्टस् इन ट्रान्सपोर्टेशन डिझायनिंग’ या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी निवड झालेला तो एकमेव्य भारतीय आहे.सध्या दिल्लीतील मारुती सुझुकीमध्ये आॅटोमोटिव्ह डिझायनर म्हणून काम करणाऱ्या धनंजयच्या ‘फलकरम’ या मॉडेलची आयआयटी पवई येथे २००७ मध्ये झालेल्या ‘टेक फेस्ट’मधील ‘टॉप टेन’मध्ये निवड झाली होती. ‘आॅडी’ ने घेतलेल्या स्पर्धेत ९०० स्पर्धकांतून अंतिम सहा जणांच्या फेरीत त्याने स्थान मिळविले होते. अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ डिझाईनमधून त्याने आॅटोमोबाईल अ‍ॅण्ड ट्रान्सपोर्टेशनचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर गुरगांवमधील मारुती सुझुकी कंपनीत सहा महिन्यांची इंटर्नशीप पूर्ण केली. ‘मास्टर आॅफ आर्टस् इन ट्रान्सपोर्टेशन डिझायनिंग’ या जागतिक पातळीवरील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एप्रिल २०१४ मध्ये त्याने जर्मनीतील फोरझायिंग विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आपल्या शैक्षणिक व अन्य माहितीसह अर्ज अपलोड केला. त्याला १८ जूनला जर्मनीत मुलाखतीसाठी बोलविण्यात आले. मुलाखतीच्या प्रक्रियेतून संबंधित अभ्यासक्रमासाठी १० जणांची निवड करण्यात आली. त्यात भारतातून एकमेव धनंजयची निवड झाली. दीड वर्षांच्या अभ्यासक्रमाची अन्य ठिकाणी सुमारे ८० लाख रुपये शुल्क आहे. मात्र, फोरझायिंग विद्यापीठात त्याला अवघ्या ३४ हजारांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. त्याला फोरझायिंग विद्यापीठ प्रवेशाचा स्टुडंटस् आयडी मिळाला असून ७ आॅक्टोबरला तो याठिकाणी प्रवेशित होईल. वाहन उद्योगातील डिझायनिंग क्षेत्रात जर्मनी, युरोप आघाडीवर आहे. आपल्या देशात गेल्या दहा वर्षांपासून त्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे याठिकाणी अजून बरच काही करता येण्यासारखे आहे. त्यासाठी या क्षेत्रातील अद्यावत शिक्षणाची गरज आहे. वाहन उद्योगातील डिझायनिंग हे एक कौशल्य आहे. ते अधिक विकसित करून या क्षेत्रात ‘बेस्ट’ बनण्याचा माझा प्रयत्न राहील. - धनंजय चिलेपोस्टर बॉय...म्हणून कॉलेजमधली ओळखसांगलीतील वालचंद कॉलेजमधून धनंजयने २००८ मध्ये बी. ई. मेकॅनिकल केले. कॉलेजमध्ये कोल्हापूरातील मुलांचा परसनॅलिटी अ‍ॅडव्हान्समेंट सर्कल आॅफ इंजिनिअरिंग (स्पेस) ग्रुप आहे. त्यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील १०० मुलांचा समावेश आहे. या ग्रुपतर्फे विविध रोबोटिक, व्हीजन स्पर्धा तसेच मुलाखतीला जाणाऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. त्यात त्याने दोन वर्षे ‘जी. के. डेव्हलपर’ म्हणून काम केले. कॉलेजच्या ‘एनडोअर’ मासिकाचे संपादक म्हणून काम केले. डिझायनिंगमधील अंगभूत कौशल्यामुळे मुखपृष्ठदेखील तो स्वत: बनवत होता. आकर्षक मुखपृष्ठ आणि डिझायनिंगमुळे त्याला कॉलेजमध्ये सर्वमित्र ‘पोस्टर बॉय’ म्हणून ओळखायचे. त्याचे वडील अनिल हे रत्नागिरीत मस्त्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.