मुंबई : मुंबईसह देशभरात अनेक ठिकाणे ही अनेकदा ‘हाय अलर्ट’वर असतात. काही ठिकाणी नैसर्गिक आपत्ती येतात तर काही ठिकाणी दहशतवादी हल्ले होतात. या आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतला आहे. देशातील सर्व विद्यापीठांना पत्र पाठवून महाविद्यालयात आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे देण्याचे निर्देश यूजीसीने दिले आहेत.आपत्कालीन परिस्थिती उद्भवते, त्या वेळी घटनास्थळी उपस्थित असणाºया सामान्य जनतेला नक्की काय करावे हे माहीत नसते. तसेच मदतकार्य कसे सुरू करावे याविषयी माहिती नसल्याने लोक घाबरतात. पण अशा परिस्थितीवर मात करून मदतकार्य लवकरात लवकर कसे सुरू होईल, हे तरुणांना माहीत असल्यास त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. यामुळे महाविद्यालयीन तरुणांना आता आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात कसे करावेत याविषयी सर्व महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये महाविद्यालयात विद्यार्थ्यांना बॉम्बची अफवा अथवा बॉम्बस्फोट, भूकंप, आग लागली, कॅम्पसमध्ये गोळीबार झाला, दहशतवादी हल्ले या आपत्कालीन परिस्थितीत काय करावे हे शिकवले जाणार आहे.या परिस्थितीबरोबरच आर्थिक अडचणी आयुष्यात आल्या तर काय करावे, याविषयीही माहिती देण्यात येणार आहे. यात अचानक मोठा आजार अथवा अपघात झाल्यास उपचारांचा येणारा खर्च, दरमहा येणारे पैसे बंद झाले, कुटुंबात कमवत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर येणाºया आर्थिक अडचणी या परिस्थितीशी दोन हात कसे करता येऊ शकतात, याविषयीदेखील प्रशिक्षण दिले जावे, असे विद्यापीठांचे सचिव पी.के. ठाकूर यांनी काढलेल्या पत्रकात निर्देश दिले आहेत. नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत कमीत कमी नुकसान कसे होऊ शकते, तसेच अनेक व्यक्तींचे प्राण कसे वाचवले जाऊ शकतात, याविषयी अनेकांना माहीतच नसते. त्यामुळे काही वेळा लोक घाबरल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाते. पण या प्रशिक्षणामुळे असे न होता मदत होईल, असे यूजीसीचे म्हणणे आहे.>नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत कमीत कमी नुकसान कसे होऊ शकते, तसेच अनेक व्यक्तींचे प्राण कसे वाचवले जाऊ शकतात, याविषयी अनेकांना माहीतच नसते. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे देण्यात येणार असल्याचे यूजीसीने स्पष्ट केले.
महाविद्यालयीन विद्यार्थी गिरवणार ‘आपत्कालीन व्यवस्थापना’चे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 2:26 AM