- खलील गिरकर मुंबई : एकेकाळी मुंबईची ओळख असलेल्या एमटीएनएल दूरध्वनी सेवेला काळाशी स्पर्धा न करता आल्याने उतरती कळा लागली आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, दर महिन्याला सरासरी ६ हजार ग्राहक एमटीएनएलकडे पाठ फिरवित आहेत. त्यामुळे एमटीएनएलपुढे आपली सेवा सुधारण्याचे व ग्राहक टिकविण्याचे आव्हान उभे राहिले आहे.एमटीएनएलवर सुमारे १८ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आहे. एमटीएनएलच्या तोट्यात वाढ होत असल्याने गेल्या काही महिन्यांपासून कर्ज काढून वेतन अदा केले जात आहे. एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाºयांना नोव्हेंबर महिन्याचे वेतन मिळण्यास डिसेंबर महिन्याची ४ तारीख उलटल्याने त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, विविध उपाययोजनांच्या माध्यमातून एमटीएनएलला गतवैभव मिळवून देण्याचा निर्धार एमटीएनएलचे मुंबई विभागाचे कार्यकारी संचालक प्रवीण पुंज यांनी व्यक्त केला आहे.एमटीएनएलच्या अंतर्गत मुंबई व ठाणे परिसरात एकूण ९ विभाग कार्यरत आहेत. त्यामध्ये पूर्व १, पूर्व २, पश्चिम १, पश्चिम २, पश्चिम ३, मध्य, दक्षिण, उत्तर व नवी मुंबई या विभागांचा समावेश आहे. या ९ विभागांमध्ये लँडलाइनचे १७ लाख ८० हजार ग्राहक आहेत. तर, ब्रॉडबँडचे ४ लाख २६ हजार ग्राहक आहेत. एमटीएनएलची मोबाइल सेवा वापरणारे ग्राहक १२ लाख ५८ हजार आहेत. लँडलाइन ग्राहकांमध्ये दर महिन्याला सुमारे २ हजारांची वाढ होत आहे, तर ब्रॉडबँडमध्ये सुमारे १५०० ग्राहकांची वाढ होत आहे, असा दावा एमटीएनएलने केला आहे.प्रत्यक्षात, एमटीएनएलच्या ग्राहक सेवेत सातत्याने घट होत असल्याचे समोर आले आहे. एमटीएनएलने २०१७-१८ च्या वार्षिक अहवालात प्रकाशित केल्याप्रमाणे मुंबईत ३१ मार्च २०१८ ला लँडलाइनचे ग्राहक १८ लाख ८ हजार १९१ होते. ही संख्या ३१ आॅक्टोबरला १७ लाख ८० हजारांवर आली आहे. म्हणजे अवघ्या ५ महिन्यांच्या कालावधीत यामध्ये सुमारे २८ हजार ग्राहकांची घट झाली आहे. ब्रॉडबँडचे ग्राहक ४ लाख ५६ हजार २८३ वरून ४ लाख २६ हजारावर घसरले आहेत. म्हणजे यामध्येदेखील ३० हजार ग्राहकांनी एमटीएनएलच्या सेवेला सोडचिठ्ठी दिली आहे. एमटीएनएलची मोबाइल सेवा वापरणारे ग्राहक १२ लाख ७७ हजार ४२६ वरून १२ लाख ५८ हजारावर घसरले आहेत. याचा अर्थ सर्व प्रकारच्या सेवांमधून दर महिन्याला सरासरी साडेपाच ते सहा हजार ग्राहक एमटीएनएलपासून दूर जात आहेत. सध्या मुंबईत एमटीएनएलमध्ये ११ हजार ९९४ कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत.‘लँडलाइन’मधून १ हजार कोटींचा महसूलएमटीएनएलला मुंबईत केवळ लँडलाइन ग्राहकांच्या माध्यमातून वर्षाला सुमारे १ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो. इतर सेवांच्या माध्यमातून मिळणारा महसूल याशिवाय वेगळा आहे. मात्र कर्जाच्या बोज्यामुळे एमटीएनएलला तोटा सहन करावा लागत असल्याकडे सूत्रांनी लक्ष वेधले.
दर महिन्याला ६ हजार ग्राहक फिरवतात एमटीएनएलकडे पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 5:43 AM