सीमा महांगडे
मुंबई : वंचित व दुर्बल घटकातील बालकांना हवे तिथे शिक्षण मिळावे, यासाठी सरकारने मोफत व सक्तिचा शिक्षण अधिकार केला. मात्र, मुंबईत २५ टक्के अंतर्गत मिळणाऱ्या प्रवेशांकडे मात्र पालकांनी पाठ फिरविली आहे. आत्तापर्यंत झालेल्या तीन फेºयांत तब्ब्ल ३,१७७ पालक संबंधित शाळांमध्ये प्रवेशासाठी गेलेच नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तिसºया फेरीनंतरही मुंबई विभागात फक्त ४८ टक्केच प्रवेश झाले आहेत. ४८ टक्के पालकांनी ते स्वत: नाकारले आहेत आणि ४ टक्के पालकांचे प्रवेश कागदपत्रे आणि इतर कारणामुळे शाळांनी नाकारले असल्याचे माहितीवरून स्पष्ट होत आहे.
शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरही सप्टेंबर महिन्यापर्यंत चाललेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे प्रवेश मिळूनही पालक या प्रवेशांकडे पाठ फिरवत असल्याचे स्पष्ट होत आहे, तसेच अद्यापही पालकांमध्ये २५ टक्के अंतर्गत होणाºया प्रवेशांबाबत नसलेली जागरूकता आणि तांत्रिक अडचणी, यामुळेही विद्यार्थी या प्रवेशांपासून वंचित राहत असल्याचे अनुदानित शिक्षण बचाव समितीचे के. नाराणयन यांनी सांगितले. या संदर्भात पालिका शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.आरटीई प्रवेशाची तिसरी फेरी सध्या सुरू असून, यामध्ये ९९८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये आत्तापर्यंत १९१ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला, तर ७४६ विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरविली आहे. २०१८ -१९ मध्ये संपूर्ण जागा भरणारच, असा मानस शिक्षण विभाग व्यक्त केला होता. यासाठी आता चौथी फेरीही आयोजित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.