महापालिका शाळेत लैंगिक शिक्षणाचे धडे
By Admin | Published: September 25, 2015 03:13 AM2015-09-25T03:13:08+5:302015-09-25T03:13:08+5:30
महापालिका शाळेतील इयत्ता नववी आणि दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून लैंगिक शिक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत.
मुंबई : महापालिका शाळेतील इयत्ता नववी आणि दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून लैंगिक शिक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत. गुरुवारी यासंबंधीची प्रशासकीय मान्यताच महापालिकेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत देण्यात आली.
शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी यासंबंधीची सूचना बैठकीत मांडली होती. सूचनेनुसार, शाळांमध्ये मुलींवर अत्याचारांच्या घटनांत वाढ होत असल्याकडे लक्ष वेधले. त्यामुळे पालिका शाळांत लैंगिक शिक्षण सुरू करणे गरजेचे असल्यावर चर्चा झाली.
प्रशासनाकडून येत्या शैक्षणिक वर्षांत वैद्यकीय अधिकारी आणि मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष यांच्या समन्वयातून यासंबंधीचा उपक्रम हाती घेण्यात येईल. यासाठी वैद्यकीय अधिकारी वर्गाला प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिवाय मुला-मुलींसाठी प्रत्येकी एक सत्र घेण्यात येणार आहे. किशोर वयातील मुला-मुलींमध्ये शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळी, प्रसूती आणि प्रजनन संस्था आणि कुटुंब नियोजन याविषयीची सखोल माहिती देण्यात येईल. जीवनकौशल्य सत्रांमध्ये विचार, निर्णयक्षमता, नाही म्हणायचे कौशल्य, सुसंवाद कसा साधावा इत्यादी विषय शिकवले जातील. महत्त्वाचे म्हणजे लैंगिक शिक्षण कसे होऊ शकते, विकृती कशा प्रकारे रोखता येऊ शकतात, मदतीसाठी कुठे संपर्क साधायचा? आदी उपयुक्त माहितीही देण्यात येणार आहे.