Join us  

स्पर्धा परीक्षांसह कौशल्य विकासाचे धडे!

By admin | Published: July 01, 2017 2:59 AM

राज्याच्या कामगार कल्याण मंडळाचा ६४वा वर्धापन दिन सोहळा १ जुलै रोजी रंगणार असून, मंडळ ६५व्या वर्षात पर्दापण करत आहे.

राज्याच्या कामगार कल्याण मंडळाचा ६४वा वर्धापन दिन सोहळा १ जुलै रोजी रंगणार असून, मंडळ ६५व्या वर्षात पर्दापण करत आहे. या नव्या वर्षानिमित्त कामगारांच्या पाल्यांना कौशल्य विकासासह स्पर्धा परीक्षांचे धडे देण्याचा मंडळाचा मानस आहे. या आणि अशा अनेक विषयांवर कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त सतीश दाभाडे यांच्याशी साधलेला हा संवाद...नव्या वर्षात कामगार व कुटुंबीयांना कोणती नवी भेट मिळणार आहे?कामगारांच्या पाल्यांना स्पर्धा परीक्षांचे धडे देण्याचा नवा उपक्रम कामगार राज्यमंत्री विजय देशमुख यांच्या आदेशानुसार सुरू केला आहे. नागपूर आणि अमरावती येथे १ मे रोजी या उपक्रमाची सुरुवात झाली असली, तरी या वर्षी तो संपूर्ण राज्यभर राबवण्याचा निर्धार केलेला आहे. याशिवाय कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांना कौशल्य विकासाचे धडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी नव्या वर्षात सुरू केली जाईल. याशिवाय कल्याण केंद्राच्या अभ्यासिका अद्ययावत करून, कामगार पाल्यांना अधिकाधिक सुविधा पुरविण्याचा मानस आहे.मंडळाच्या डिजिटायझेनशबाबत काय?मंडळाचे संगणकीकरण करण्याचा प्रस्ताव कामगार विभागाचे प्रधान सचिव बलदेव सिंह यांच्याकडे पाठविलेला आहे. या वर्षी तो मंजूर झाल्यास सर्व कामगारांना आॅनलाइन नोंदणी करता येणार आहे, शिवाय सर्व आस्थापनांना कामगारांचा कल्याण निधी आॅनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध होईल.प्रस्तावात आणखी काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत का?होय, कामगारांना नोंदणी किंवा मंडळाच्या योजनांबाबत कोणतीही समस्या असल्यास, त्याबाबत विचारणा करण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. लवकरच त्यास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास राज्यातील कोणत्याही आस्थापनेतील कामगाराला मंडळातील प्रत्येक योजनेची माहिती एका कॉलवर उपलब्ध होईल.वर्धापन दिनादिवशी एखाद्या नव्या उपक्रमाबाबत घोषणा होईल का?वनमहोत्सवाचे निमित्त साधत, कामगार कल्याण मंडळाच्या वर्धापन दिनी वृक्ष लागवड सप्ताहाची सुरुवात केली जाईल. या उपक्रमांतर्गत कल्याण मंडळाच्या प्रत्येक केंद्राकडून प्रत्येकी १० वृक्षांची लागवड करून संवर्धन केले जाणार आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवण्यासाठी मंडळाकडून आठवडाभर वृक्ष दिंडी, परिसंवाद, चित्रकला, वेशभूषा अशा विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.मंडळाच्या दुर्लक्षित राहिलेल्या उपक्रमाबाबत काय सांगाल?मंडळातर्फे कामगार व कुटुंबीयांसाठी ‘परदेशी भाषा संभाषण वर्ग’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मात्र, गेल्या वर्षभरात इंग्रजी वगळता, इतर भाषांच्या वर्गांना म्हणावा तसा प्रतिसाद नाही. मुळात जपानी, चिनी, जर्मन, फ्रेंच या भाषांमुळे विविध रोजगारांची दालने खुली होतात. मात्र, त्याचे महत्त्व ग्रामीण भागासह शहरी भागांतील तरुणांना नसल्याने, या वर्गांबाबत जनजागृतीचा प्रयत्न सुरू आहे.कल्याण मंडळाच्या योजनांपासून वंचित राहणाऱ्या कामगारांना काय सांगाल?सध्या मंडळाकडे ४१ लाख कामगारांची नोंदणी आहे. संघटित आणि असंघटित क्षेत्रातील प्रत्येक कामगाराला मंडळाच्या उपक्रमांचा लाभ घेता येतो. पाच किंवा त्याहून अधिक कामगार असलेल्या आस्थापनांमधील कामगारांना मंडळाकडे नोंदणी करता येते. जे मालक कामगारांची नोंदणी करत नाहीत, त्यांना कामगार कल्याण मंडळाच्या विभागीय कार्यालयात किंवा कल्याण आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करता येते. दोषी ठरणाऱ्या मालकांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.