महाकरिअर पोर्टलकडे विद्यार्थ्यांची पाठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:05 AM2021-04-14T04:05:42+5:302021-04-14T04:05:42+5:30

नववी ते बारावीच्या केवळ ९ टक्के मुलांचेच लॉगिन सीमा महांगडे मुंबई : राज्यातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा ...

Lessons of students to MahaCareer Portal! | महाकरिअर पोर्टलकडे विद्यार्थ्यांची पाठ !

महाकरिअर पोर्टलकडे विद्यार्थ्यांची पाठ !

Next

नववी ते बारावीच्या केवळ ९ टक्के मुलांचेच लॉगिन

सीमा महांगडे

मुंबई : राज्यातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी राज्य सरकारचा शालेय शिक्षण विभाग, युनिसेफ व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या एकत्रित सहकार्याने ‘महाकरिअर पोर्टल’ सुरू करण्यात आले. मात्र, विद्यार्थ्यांनी याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

राज्यातील नववी ते बारावीच्या ४३ लाख ६२ हजार ४९० विद्यार्थ्यांपैकी फक्त ३ लाख ७६ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी म्हणजे केवळ ८.६३ टक्के विद्यार्थ्यांनीच आतापर्यंत या पोर्टलला लॉगिन केले.

या पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे ५५६ अभ्यासक्रम व २१,००० व्यावसायिक संस्था तसेच महाविद्यालयांची माहिती देण्यात आली असून अभ्यासक्रमाचा कालावधी, शुल्क, १,१५० प्रवेश परीक्षा, १२०० शिष्यवृत्ती, उपलब्ध नोकरी आदी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. तरीही विद्यार्थ्यांनी याचा हवा तेवढा उपयोग करून न घेतल्याचे समाेर आले आहे.

काेराेना काळ, अकरावीची लांबलेली प्रवेश प्रक्रिया, नववीचे ऑनलाईन शिक्षण, लांबणीवर पडलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांचे टेन्शन या सर्वांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीच्या प्रक्रियेवर होणार असल्यानेही याला कमी प्रतिसाद मिळाल्याचे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले, तर या करिअर पोर्टलसाठी सरल आयडी आवश्यक असून लॉकडाऊन काळात अनेक विद्यार्थ्यांना तो प्राप्त न झाल्याने ते माहिती घेऊ शकले नसतील, असाही अंदाज काही अधिकारी व्यक्त करत आहेत.

* असा मिळाला प्रतिसाद

- जालना, लातूर, मुंबई उपनगर, वाशीम, बीड, जळगाव, यवतमाळ, उस्मानाबाद, नाशिक, सातारा, सांगली, बुलडाणा या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद हा १ टक्क्याहून कमी असल्याचे माहितीवरून समोर आले.

- वर्धा, नांदेड, परभणी, नंदुरबार, औरंगाबाद या जिल्ह्यांतील प्रतिसाद हा १ टक्क्याहून अधिक आहे. रत्नागिरी, गोंदिया जिल्ह्यातून २ टक्क्यांहून अधिक, तर धुळे, पालघर, भंडाऱ्यातून ३ टक्क्यांहून अधिक प्रतिसाद विद्यार्थ्यांनी करिअर पोर्टलला दिला. मुंबईतून ४ टक्क्यांहून अधिक, तर पुण्यातून ६ टक्क्यांहून अधिक प्रतिसाद दिला. महाकरिअर पोर्टलला सर्वाधिक नागपूरमधून ४२ टक्के विद्यार्थ्यांनी लॉगिन करून माहिती मिळवली, तर सोलापूर, अहमदनगर, चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी २५ ते ४० टक्क्यांदरम्यान प्रतिसाद दिला.

- ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अकोला, गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी ११ ते २० टक्क्यांदरम्यान प्रतिसाद देऊन लॉगिन करून विविध अभ्यासक्रम, शिष्यवृत्तींची माहिती मिळविली.

* ...त्यानंतरच देता येईल लाॅगिनची माहिती

सध्या कोरोनामुळे शाळा आणि बहुतांश विद्यार्थ्यांचा संपर्क तुटलेला आहे. खास नववी ते बारावीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेले महाकरिअर पोर्टल आणि त्यावर लॉगिन होण्याची माहिती विद्यार्थ्यांना शाळा प्रत्यक्ष सुरू होऊ शकतील तेेव्हाच प्रात्यक्षिकांसह देऊन ही संख्या वाढविता येईल.

- जयवंत कुलकर्णी, शिक्षक समुपदेशक

..........................

Web Title: Lessons of students to MahaCareer Portal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.