Join us

४० हजार शिक्षकांना देणार इंग्रजीचे धडे, २०२१पर्यंत ध्येय गाठण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 6:40 AM

राज्यातील शिक्षकांच्या इंग्रजीचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीप्रमाणे वाढवण्यासाठी ब्रिटिश काउन्सिलने पुढाकार घेतला आहे.

- खलील गिरकर मुंबई : राज्यातील शिक्षकांच्या इंग्रजीचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीप्रमाणे वाढवण्यासाठी ब्रिटिश काउन्सिलने पुढाकार घेतला आहे. ‘तेजस’ या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील ४० हजार शिक्षकांना इंग्रजीचे प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित करण्यात येईल व त्यांच्या माध्यमातून २५ लाख विद्यार्थ्यांच्या इंग्रजीचा दर्जा सुधारून त्यांना इंग्रजीमध्ये निष्णात बनवण्यात येईल, अशी योजना आखण्यात आली आहे. २०२१ पर्यंत हे धेय्य गाठण्यात यश येईल, अशी माहिती ब्रिटिश काउन्सिलच्या वेस्ट इंडियाच्या संचालिका हेलन सिल्वेस्ेटर यांनी ‘लोकमत’ला दिली.आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी व कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी इंग्रजीचे ज्ञान असणे अनिवार्य असते. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला केवळ उत्तम इंग्रजी अभावी संधी नाकारली जाऊ नये, यासाठी त्यांना उत्तम इंग्रजीचे धडे देण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. शिक्षकांच्या गुणवत्तेचा विद्यार्थ्यांवर प्रभाव पडतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे इंग्रजी शिकविण्यासाठी खास प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांंच्या माध्यमातून शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येईल व ते शिक्षक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करतील. महिला सक्षमीकरणासाठी देशातील १०० तरुणींना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील १०० तरुणींचा समावेश असल्याची माहिती सिल्वेस्टर यांनी दिली. भारतव इंग्लंडचे संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने ब्रिटिश काउन्सिलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ज्ञान अधिक समृद्ध करणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी काउन्सिल विविध योजना राबवत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्य व केंद्र सरकारचे चांगले सहकार्य मिळत असल्याचे सिल्वेस्टर यांनी आवर्जून नमूद केले.>राज्य सरकारसोबत सामंजस्य करारब्रिटिश काउन्सिलने राज्य सरकारसोबत सामंजस्य करार करून, सरकारला इंग्रजी प्रशिक्षणामध्ये साहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत सरकारी शाळांमधील शिक्षकांना निवडण्यात येईल व टीचर्स अ‍ॅक्टिव्हिटी ग्रुप, वर्कशॉपच्या माध्यमातून व व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधण्यात येईल आणि त्यांना प्रशिक्षित करण्यात येईल.

टॅग्स :शिक्षक