तरुणाईस कथाकथनाचे धडे
By admin | Published: January 24, 2017 06:21 AM2017-01-24T06:21:05+5:302017-01-24T06:21:05+5:30
कोकण मराठी साहित्य परिषद - युवाशक्ती कॉलेज कट्टा यांच्या वतीने घाटकोपर येथील रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयात
मुंबई : कोकण मराठी साहित्य परिषद - युवाशक्ती कॉलेज कट्टा यांच्या वतीने घाटकोपर येथील रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयात ‘कथाकथन - मंत्र आणि तंत्र’ हा २७वा उपक्रम नुकताच पार पडला. या वेळी प्रसिद्ध कथाकथनकार व बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांनी कथा म्हणजे काय? त्याचे पारंपरिक स्वरूप, आजचे स्वरूप कथन म्हणजे काय? कथा निवड कशी करायची? वेळेच्या बंधनानुसार कथा कशी सादर करायची? ती सादर करतानाची तंत्र अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितली.
या वेळी त्यांनी तीन कथादेखील सादर केल्या. वाचिक आणि कायिक अभिनयाची झलकही त्यांनी आपल्या सादरीकरणातून दाखविली. कथाकथनाचे तंत्र समजावताना आत्मविश्वास, विषयाची तयारी, तन्मयता इ. गोष्टींचे मार्गदर्शन केले गेले. कथाकथन कसे करावे याचे प्रात्यक्षिक कथा सादर करून दिले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.
या उपक्रमासाठी आर. जे. महाविद्यालय, सोमय्या महाविद्यालय, विद्यानिकेतन महाविद्यालय अशा विविध महाविद्यालयांतील प्राध्यापकवर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. दीपा ठाणेकर यांनी केले. याप्रसंगी एकनाथ आव्हाड यांचा शाल व श्रीफळ देऊन निखिल मोंडकर यांनी सत्कार केला. कवी सुनील देवकुळे उपस्थित राहिले. आकाश नलावडे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)