मुंबई : यंदा शाळा, महाविद्यालये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सद्य:स्थितीत बंदच असून, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. अशा परिस्थितीत आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशांना मिळणारा प्रतिसाद ही थंडावला आहे. अनेक विद्यार्थ्यांची निवड पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी होऊनही अद्याप त्यांचे प्रवेश झाले नसल्याने आरटीई प्रवेशाच्या पहिल्या फेरीच्या प्रवेशांसाठी आता दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. या आधी ९ जुलैपर्यंत प्रवेशाची संधी विद्यार्थी पालकांना देण्यात आली होती आता ती वाढवून २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका आणि उपसंचालक कार्यालयांतर्गत विभागात उपलब्ध एकूण ६स९६५ जागांपैकी केवळ २,४७३ जागांवर निश्चित प्रवेश पूर्ण झाले आहेत.
आरटीईअंतर्गत राज्यात ९ हजार ४३२ शाळांमध्ये ९६ हजार ६८४ जागा यंदा उपलब्ध आहेत. शिक्षण विभागाने मार्चमध्ये जाहीर केलेल्या सोडतीमध्ये ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यावर शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया सुरू करून ११ ते ३० जून दरम्यान प्रवेशप्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले होते. मात्र या मुदतीत निवड झालेल्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने पहिली मुदतवाढ ९ जुलैपर्यंत आणि आता दुसरी मुदतवाढ २३ जुलैपर्यंत देण्यात आली आहे. मुंबई विभागात अद्याप काही प्रमाणात लॉकडाऊन कायम असल्याने अद्याप अनेक पालकांनी शाळांना संपर्कच केला नसल्याने प्रवेश रेंगाळले असल्याचे समोर येत आहे.
मुंबई वगळता पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांची उपस्थिती ५० आणि दहावी बारावीच्या शिक्षकांची उपस्थिती १०० टक्के आहे. मात्र तरीही आरटीई प्रवेशाची प्रक्रिया मात्र संथगतीने सुरू आहे. अनेक शाळा प्रवेश द्यायला टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. आधीच शुल्क प्रतिपूर्तीमध्ये यंदा घट करण्यात आल्याने तसेच शाळांच्या आधीच्या शुल्क प्रतिपूर्तीही न झाल्याने संस्थाचालक प्रवेशात टाळाटाळ करत आहेत. मागील शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम लवकरात लवकर शाळांच्या खात्यात वर्ग करावी अशी मागणी ते करत आहेत.
पालकांच्या अडचणी
प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक असून, तो अजून मिळालेला नाही. त्यामुळे तो जमा करीत नाही तोपर्यंत प्रवेश होऊ शकणार नाही, असे सांगितले आहे. प्रवेश होत नाही तोपर्यंत अभ्यास सुरू होणार नाही. मुलांचे वर्ग आणि ऑनलाइन शिक्षण याधीच सुरू झाले नाही. जोपर्यंत प्रवेश होईल तोपर्यंत मुले अभ्यासात मागे राहतील, अशी भीती आहे.
सावित्री विचारे, पालक
-----
सद्यस्थितीत शाळा पूर्ण दिवस सुरू नसते. ४ ते ५ तास काही शिक्षक आणि कर्मचारी वर्ग उपलब्ध असतो. बऱ्याचदा प्रवेश करणारा कर्मचारी वर्ग उपस्थित नसल्याने परत यावे लागले आहे. आमचे ही काम सुरू झाल्याने शाळेची वेळ आणि आमच्या ऑफिसची वेळ ठरवून प्रवेश घ्यायला जावे लागणार आहे.
मुकुंद गर्जे, पालक
शिक्षण विभागाकडून प्रवेश घेण्याचे आवाहन
आरटीई प्रवेशप्रक्रियेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे मात्र त्यांनी अद्याप प्रवेश घेतले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळांनी संपर्क करून, आवश्यक बाबी पूर्ण करून विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती करून घ्यावी जेणेकरून विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर राहणार नाहीत अशा सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या आहेत. दरम्यान, पालकांना बोलावलेल्या तारखेला शाळेत जाऊन सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शाळा स्तरावरच प्रवेशनिश्चिती करायची आहे. कागदपत्रे पडताळणीसाठी पालकांनी गर्दी करू नये, ई-मेल, दूरध्वनीद्वारे संपर्क करून प्रवेश करून घ्यावेत असे सांगण्यात आले आहे.
चौकट
जिल्हा - आरटीई शाळा - निवड झालेले विद्यार्थी - प्रवेशित विद्यार्थी - तात्पुरते प्रवेशित
मुंबई (पालिका)- २९०- ३८२५-१६९२-१८०५
मुंबई (डिव्हायडी)- ६२-११६०-७८१-७१७
एकूण - ३५२-४९८५-२४७३-२५२२